Pages

Wednesday 11 January 2012

ना.शिवाजीराव मोघेंकडून आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार



स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतांना सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांनी घाटंजी तालुक्यातील ग्रामिण भागात भुमिपुजन व नागरिकांना प्रलोभन दाखविणारे कार्यक्रम घेतल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे व कुर्ली येथिल सरपंच सोलंकी यांनी राज्य निवडणुक आयोग व संबंधीतांकडे केली आहे.
विशेष उल्लेखनिय म्हणजे या भुमिपूजन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. दि.८ व १० जानेवारीला हा धडक कार्यक्रम राबविण्यात आला. तब्बल २ कोटी ११ लाख रूपयांच्या कामांचे भुमिपूजन यादरम्यान करण्यात आले अशी माहिती आहे. उल्लेखनिय म्हणजे प्रत्यक्ष कुदळ मारून औपचारीकपणे भुमिपूजन करण्यात आले नसले तरी निमंत्रण पत्रिकेत नमुद असलेल्या गावामध्ये सभा घेऊन मंजुर झालेल्या कामांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. तसेच कोणती कामे मंजुर करण्यात आली आहेत ते प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन ग्रामस्थांना सांगण्यात आले. त्यामुळे हा देखिल आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी नागरिकांनी छायाचित्र घेण्याचा प्रयत्न केला असता आयोजकांनी त्यांना मज्जाव केल्याची माहिती आहे.
या सर्व कार्यक्रमांना ना.शिवाजीराव मोघे, जिल्हा परिषद सदस्य जयप्रकाश काटपेल्लीवार, देवानंद पवार यांचेसह पंचायत समितीचे काही पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. भुमिपूजन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका आचारसंहिता लागल्यावर ग्रामिण भागात वाटण्यात आल्या. निमंत्रण पत्रिकेत नमुद कार्यक्रमाप्रमाणे दि.८ जानेवारीला सकाळी १० वाजेपासुन पंगडी, सायतखर्डा, बोधडी, झटाळा, तरोडा, वघारा, सावंगा, कालेश्वर, माथनी, जांब, पार्डी, किन्ही, वाढोणा, लिंगापुर येथे कार्यक्रम झाले. त्यानंतर दि. १० जानेवारीला सायफळ, ताडसावळी, चिखलवर्धा येथे नियोजीत वेळेवर कार्यक्रम झाले. आचारसंहितेच्या काळात विकासकामाचे भुमिपूजन केल्याच्या कारणावरून राज्य निवडणुक आयोगाने राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजीत पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असताना राज्याचे आणखी एक कॅबिनेट मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांनीही मतदारांना प्रलोभन दाखविण्याच्या उद्देशाने आचारसंहितेच्या काळात अशाप्रकारचा कार्यक्रम घेतल्याने विरोधकांच्या हाती आयताच मुद्दा मिळाला आहे. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकषी करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी संबंधीतांवर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
साभार :- देशोन्नती

No comments:

Post a Comment