Pages

Thursday 29 September 2011

शिवसेना उपजिल्हा प्रमुख शैलेश ठाकुर यांना पत्नीशोक


शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शैलेश ठाकुर यांच्या पत्नी तथा घाटंजी नगर परिषदेच्या नगरसेविका सौ बरखा ठाकुर यांचे ब्रेन हॅमरेज झाल्याने नागपुर येथे उपचारा दरम्यान आज रात्री ८ वाजेदरम्यान दु:खद निधन झाले.
त्यांच्या मागे १ मुलगा, १ मुलगी व पती शैलेश ठाकुर व मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने घाटंजी तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Monday 26 September 2011

एस.पी.एम. कॉन्व्हेंट च्या प्रदर्शनीत चिमुकल्यांचा कलाविष्कार

स्थानिक एस.पी.एम.प्रि.प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कुल च्या वतीने गिलानी महाविद्यालयाच्या सभागृहात नुकतीच प्रकल्प व विज्ञान प्रदर्शनी घेण्यात आली. या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेऊन आपली कला व वैज्ञानीक गुणांचे प्रदर्शन केले.
या प्रदर्शनीचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सद्रुद्दीनभाई गिलानी यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष संजय गढीया, सचिव अनिरूद्ध लोणकर, संचालक आर.यु.गिरी, गिलानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.ए.शहजाद, शाळेचे मुख्याध्यापक एम.आर.शुक्ला, प्रोजेक्ट डायरेक्टर अलिया शहजाद यांची उपस्थिती होती. ही प्रदर्शनी पाहण्याकरीता पालकवर्ग, मान्यवर शिक्षकवृंद तसेच अनेक विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. चिमुकले विद्यार्थी प्रदर्शनी पाहणा-यांना आपल्या प्रयोगाविषयी अत्यंत उत्साहाने माहीती देत होते. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांचा विकास व्हावा आजुबाजुच्या परिसरातील विवीध पैलुंची त्यांना जाणीव व्हावी तसेच त्यांच्यातील आत्मविश्वास वृद्धींगत व्हावा या दृष्टीकोणातुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रोजेक्ट डायरेक्टर अलिया शहजाद यांच्या संकल्पनेतुन साकारलेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस.के.ताजने, एस.पी.राऊत, पी.पी.वानखडे, ए.आर.भोसले, एस.व्ही.पिलावन, एस.डी.ठाकरे, एस.एम.लापसिया, आर.बी.कवडे, एम.एस.चौधरी, यु.ए.गोखरे, एस.डी.देवकते, जे.एस.भरारे, एम.एस.ठाकरे, एस.एस.राठोड, के.एस.ठाकरे, पी.एन.ठाकरे, आर.पी अक्कलवार, एस.एन.कोंबे, एन.आर.सायरे, यु.एस.राऊत, आर.व्ही.बिराळे, के.टी.भोयर, एस.एस.गरड, आर.पी.डंभारे, ए.एम.तोडकर, एम.एम.वैद्य, के.के.आगरकर यांनी परिश्रम घेतले.
अमरावती येथिल हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ परिसरात नुकत्याच झालेल्या अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सवात आकर्षक लोकनृत्य सादर करतांना घाटंजी येथिल गिलानी महाविद्यालयाची चमु.

किड नियंत्रणासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन घ्या - पी.पी.घुले


तालुक्यात मार्गदर्शन सभांचे आयोजन
तालुक्यात झालेल्या सततच्या पावसामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी शेतक-यांनी कृषी विभागाचे मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी पी.पी.घुले यांनी केले आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय घाटंजी मार्फत पिकावरील किड, रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसप) २०११-१२ अंतर्गत सोयाबिन पीक संरक्षण जनजागृती पंधरवाड्यामध्ये तालुक्यात शेतकरी सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या हंगामात झालेल्या सततच्या पावसामुळे सोयाबिन, कापुस, तुर या पिकांवर किड रोगांचा प्रादुर्भाव झाला असुन त्यावर नियंत्रण तसेच उपाययोजना करण्यासाठी कृषी विभाग गावागावात सभा घेऊन त्याबाबत मार्गदर्शन करणार आहे.

Sunday 25 September 2011

खडतर रस्त्यावरून जिल्हाधिकारी दुचाकी चालवितात तेव्हा..!



खाच खळग्यांनी व्यापलेल्या रस्त्यावरून वाटचाल करणे हा सर्वसामान्यांच्या राहणीमानाचाच एक भाग झाला आहे. ग्रामिण भागातील काही रस्त्यांनी तर वाहने चालविणे सुद्धा शक्य होत नाही. मात्र अशाच एका खडतर रस्त्यावरून खुद्द यवतमाळचे जिल्हाधिकारी श्रावण हर्डीकर यांनी चक्क दुचाकी चालविण्याचा अनुभव घेतला. एका उच्च पदावर विराजमान असलेल्या व्यक्ती मधील ‘साधा माणुस' या निमित्ताने अनेकांना अनुभवास आला.
रोजगार हमी योजनेच्या कार्यशाळेसाठी ते घाटंजी येथे आले होते. या कार्यशाळेला तालुक्यातील ग्रा.पं.सरपंच, उपसरपंच तसेच इतर विभागातील अधिकारी, कर्मचा-यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात केळापुर तांड्यावरील ग्रा.पं.उपसरपंचाच्या पतीने जिल्हाधिका-यांना तांड्यावर येऊन तेथिल भिषण परिस्थिती पाहण्याचे भावनिक आवाहन केले. जिल्हाधिका-यांनीही कार्यक्रम आटोपता घेत रात्री ७.३० वाजता  सर्व ताफ्यासह केळापुर तांड्याकडे प्रयाण केले. मात्र मुख्य रस्त्यापासुन २ किलोमिटर आत मध्ये असलेल्या तांड्यावर जाण्यासाठी असलेला रस्ता खड्ड्यांनी व्यापलेला होता. त्यामुळे वाहने तिथेच ठेऊन जिल्हाधिकारी श्रावण हर्डीकर, इतर सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी २ कि.मी.चालत जाऊनच तांडा गाठला. या भागात असलेल्या भिषण असुविधांबद्दल जिल्हाधिका-यांनी चिंता व्यक्त करून त्या सोडविण्यासाठी शक्य तितक्या लवकर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्याच प्रमाणे ग्रामिण भागातील समस्यांवर काटेकोरपणे लक्ष पुरविण्याचे स्थानिक यंत्रणेला आदेश दिले.
साहेब गावात पोहचले त्यावेळी तांड्यावरील संत सेवालाल मंदिरात आरती सुरू होती. येथिल आध्यात्मिक वातावरणाने ते भारावले. जिल्हाधिकारी प्रथमच तांड्यावर आल्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना चहापान करण्याचा आग्रह केला. मात्र व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांनी त्यास नम्र नकार दिला व गावक-यांचा मान राखत साखर खाऊन त्यांनी तोंड गोड केले. त्यानंतर परत येतांना अचानक जिल्हाधिका-यांच्या समोरूनच एक साप गेला. त्यामुळे यंत्रणेची भंबेरी उडाली. मात्र साप मुकाटपणे निघुन गेल्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर तांड्यावरून दुचाकी बोलविण्यात आली. दुचाकी मागे बसण्या ऐवजी जिल्हाधिका-यानी गाडी चालविण्याची ईच्छा बोलुन दाखविली. आणी या खडतर रस्त्याने ते एका सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे दुचाकी सांभाळत मुख्य रस्त्यापर्यंत गेले. एका सनदी अधिका-याच्या व्यक्तीमत्वातील कमालीचा साधेपणा घाटंजी तालुक्याने अनुभवला.

Friday 23 September 2011

जि.प.सदस्य सुरेश लोणकर यांना बंधुशोक

जिल्हा परिषद सदस्य सुरेश लोणकर यांचे बंधु व विवीध खेळांचे क्रिडा मार्गदर्शक अनिल लोणकर यांचे काल (दि.२२) ला ह्नदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले. आज दुपारी १२ च्या सुमारास शिरोली येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शिरोली येथे राजकीय नेते, अधिकारी तसेच हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.
जिल्ह्यातील क्रिडा क्षेत्रात अनिल लोणकर यांचे नाव आदराने घेतल्या जाते.  ते एक उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळाडू होते. तसेच कबड्डी, खो-खो या खेळांचे मार्गदर्शक म्हणुनही त्यांनी कार्य केले होते. यावेळी माजी खासदार सदाशिवराव ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. सभेचे प्रास्ताविक रामदास दरणे यांनी केले. सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, विधानसभेचे उपाध्यक्ष वसंतराव पुरके, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे यांचेसह अनेकांनी यावेळी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार उत्तमराव पाटील, जि.प. अध्यक्ष राहुल ठाकरे, उपाध्यक्ष रमेश मानकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनिष पाटील, यवतमाळचे नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, जि.प.सदस्य  प्रविण देशमुख, तातु देशमुख,  वसंत घुईखेडकर, बाबासाहेब गाडे पाटील, माजी आमदार डॉ. संदिप धुर्वे, कुणबी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सतिष भोयर, अशोक बोबडे, शि.प्र.मं.घाटंजीचे अध्यक्ष सद्रुद्दीन गिलानी, सचिव अनिरूद्ध लोणकर, विजय मोघे, देवानंद पवार, भरत राठोड यांचेसह राजकीय, सामाजीक क्षेत्रातील नागरिकांनी शिरोली येथे उपस्थिती दर्शविली. घाटंजी तालुक्यातील हजारो नागरीक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.


Friday 16 September 2011

घाटंजीचा वादग्रस्त शिक्षक गिनगुले निलंबीत


मुरलीच्या ग्रामस्थांचा लढा यशस्वी

लाखो रूपयांची अफरातफर केल्याचा आरोप असलेल्या डी.डी. गिनगुले या वादग्रस्त शिक्षकाला अखेर जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम यांनी निलंबीत केले. निलंबन काळात त्याला उमरखेड पंचायत समिती देण्यात आली आहे. 
एका जिल्हा परिषद सदस्याच्या दादागीरीमुळे गेल्या काही काळात चर्चेत आलेल्या या शिक्षकावर अनेक आरोप आहेत. कोणतीही पुर्वसुचना न देता तब्बल आठ महिने ड्युटीवरच न गेलेल्या गिनगुले याला मुरली या गावीच नियुक्त करण्यात यावे यासाठी मंत्र्यांच्या निकटस्थ असलेल्या एका जिल्हा परिषद सदस्याने राजकीय पदाचा गैरवापर करून तसेच प्रसंगी पंचायत समिती कार्यालयात धुडगूस घालुन दबावतंत्राचा वापर केला होता. मात्र मुरली येथिल ग्रामस्थांचा या शिक्षकाच्या नियुक्तीला ठाम विरोध होता. त्यामुळे येथिल ग्रामस्थांनी १ जुलै रोजी शाळेला कुलूप ठोकले होते.  हा विरोध दडपण्यासाठी त्या जि.प.सदस्याने घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार खंदारे व स.पो.नि. गुरनूले यांच्या माध्यमातुन मुरली येथे पोलीस ताफा पाठवुन गावक-यांना धमकाविण्याचाही प्रयत्न केला होता.
डी.डी. गिनगुले हा जानेवारी २००४ ते ३ सप्टेंबर २०१० या कालावधीत तालुक्यातील सावंगी संगम येथिल जि.प. शाळेवर कार्यरत होता. त्यावेळी काही काळ मुख्याध्यापक पदाचा प्रभार त्याचेकडे होता. त्यावेळी त्याने शासनाकडून मिळालेला निधी, ई वर्ग जमिनीच्या हर्रासातुन शाळेला मिळालेली रक्कम, सर्व शिक्षा अभियान, मानव विकास मिशन च्या रकमेतुन सुमारे २ लाख  रूपयांची अफरातफर केल्याची तक्रार सावंगी संगम येथिल शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी केली होती. तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान केल्या प्रकरणी गिनगुलेची ग्रामस्थांनी तक्रार केली होती. त्यानुसार पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी आर. डी. पार्लावार यांनी या तक्रारीची चौकशी केली. त्यामध्ये सदर प्रभारी मुख्याध्यापकाने गैरप्रकार केल्याचे चौकशीत आढळुन आले. धामनदरी जि. प. शाळेचे अर्धवट बांधकाम तसेच या कालावधीत शालेय पोषण आहार शिजवणा-या महिलेचे वेतनही देण्यात न आल्याचे आढळले. तसा अहवालही चौकशी अधिका-याने गटशिक्षणाधिका-याकडे सोपवला. त्यानंतर गिनगुले कडुन मुख्याध्यापक पदाचा प्रभार काढुन घेण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीने केली. परंतु आदेश मिळुनही त्या शिक्षकाने प्रभार दिला नाही. त्यामुळे पंचनामा करून एकतर्फी प्रभार काढण्यात आला. मात्र या प्रकरणी थातुर मातुर कारणे दाखवा नोटिस बजावण्याची औपचारीकता वगळता पंचायत समितीने अद्याप कोणतीही कार्यवाही केली नव्हती. विषेश म्हणजे दि. ४ सप्टेंबर २०१० पासुन सदर शिक्षक शाळेवर कोणतीही पुर्वसुचना न देता गैरहजर होता . या सर्व प्रकारानंतर त्याचेवर कार्यवाही होण्याऐवजी त्याला घाटंजी लगत असलेल्या मुरली गावी स्थानांतरीत करण्यात आले. मात्र गावक-यांच्या विरोधामूळे त्याला रूजू करून घेण्यात आले नाही. तरी देखिल जि.प.सदस्याने हा मुद्दा प्रतिष्ठेचा करून गिनगुलेला मुरली येथेच नियुक्त करण्याचा हेका धरला.
त्यामुळे गिनगुलेचे प्रकरण अनेक महिण्यांपासुन रेंगाळतच होते. मात्र मुरली येथिल यादव निकम यानी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन आमदार संदिप बाजोरीया, सुमित बाजोरीया, कुणबी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सतिष भोयर यांनी या प्रकरणात विषेश लक्ष घालुन मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे या प्रकरणात योग्य कार्यवाही करण्याची विनंती केली होती. त्यामुळे अखेर सर्व बाबींचा विचार करून डी.डी. गिनगुले याचेवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली. याबाबत प्रतिक्रीया देताना सतिष भोयर म्हणाले की, शैक्षणीक क्षेत्रातील बेशिस्त प्रवृत्तींना  पाठीशी घालण्याचा प्रकार योग्य नाही. गिनगुले यांचेवर झालेल्या कार्यवाहीतुन ईतर कर्मचा-यांनी धडा घेणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
साभार: देशोन्नती 

Thursday 15 September 2011

घाटंजी तालुक्यात पावसाचे थैमान; नवविवाहीतेचा मृत्यू



गेल्या दोन दिवसांपासुन तालुक्यात विजेच्या कडकडाटासह झालेल्या संततधार पावसामुळे शेतक-यांना चिंतेत टाकले असुन जनजीवनावरही परिणाम झाला आहे. तालुक्यातील झटाळा येथिल मनिषा राजु कुडमेथे (वय २३) या महिलेचा नाल्याच्या पुरात वाहुन गेल्याने मृत्यू झाला. सदर महिला तिच्या पती सोबत कुर्ली येथुन दुचाकीवर येत होती. नाल्याच्या पुलावरून जात असतांना अचानक पुराचा लोंढा आल्याने दोघेही प्रवाहात पडले. त्यानंतर पतीला झाडाचा आधार मिळाल्याने त्याला बाहेर निघता आले. मात्र महिला पुरात वाहुन गेली. दुस-या दिवशी नाल्याच्या काठावर तिचे प्रेत आढळले. यावर्षी एप्रिल महिण्यातच त्यांचे लग्न झाले होते.
पेरणी, बियाणांचा दगा व त्यामुळे झालेली दुबार पेरणी या संकटाने अगोदरच जायबंदी झालेल्या शेती व शेतक-यांना संततधार पावसाने पुन्हा संकटात टाकले आहे. मानवनिर्मित आपत्तीनंतर आलेल्या या नैसर्गिक आपत्तीने बळिराजा पुरता हतबल झाला आहे. रोजच्या रिमझिम पावसामुळे खरीप पिकांच्या आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत. परिणामी हलक्या जमिनीतील पिके पिवळी पडू लागली आहेत.जमिनीतील पाण्याचा निचरा न झाल्याने मुळाद्वारे पाणी व अन्नद्रव्य शोषले जात नाही. तीन ते चार टक्के पिके जळाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली नसल्याने ढगाळ वातावरणामुळे पिकांसाठी रोगट हवामान तयार होत आहे. सततच्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचले आहे. पिके पाण्यात असल्यामुळे पिवळी पडून नुकसान होत आहे. बहुतांश भागातील कापसाचे पीक पिवळसर पडू लागल्याने शेतक-यांची चिंता वाढली आहे. सततच्या पावसामुळे कामे रखडली असून दिनक्रमही बदलला आहे.सध्या कापसाचे पीक भरण्याच्या अवस्थेत आहे. मध्यंतरी पावसाने विश्रांती दिल्याच्या काळात शेतक-यांनी कापसाला खताचा डोस देऊन ठेवला. तीन दिवस सलग पाऊस पडल्या नंतर शेतकरी आनंदित झाला; परंतु अधुनमधून पाऊस पडत असल्याने शेतक-यांच्या आनंदावर पाणी फेरले जाण्याची वेळ आली आहे. विषेश म्हणजे पावसाळा संपण्याच्या मार्गावर असतांनाही वातावरणातील उकाडा मात्र कमी झालेला नाही. पाऊस पडून गेल्यावर तापणा-या कडक उन्हामुळे वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत आहे.

Wednesday 14 September 2011

‘समर्थ' च्या माजी अध्यक्ष व सचिवाविरोधात फौजदारी याचिका


बनावट दस्तावेज प्रकरण
शहरातील प्रमुख शैक्षणीक संस्थानांपैकी असलेल्या श्री. समर्थ शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष निळकंठ डंभारे व माजी सचिव शांताराम गुप्ते यांचे विरोधात येथिल प्रथम श्रेणी न्यायालयात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यांनी खोट्या दस्तावेजाद्वारे बँकेतुन रकमेची उचल करून संस्थेची कथितपणे फसवणुक केल्या प्रकरणी मंडळाचे अध्यक्ष य.शा.महल्ले  यांनी ही याचिका दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्री समर्थ शिक्षण मंडळातील निळकंठ डंभारे यांचे अध्यक्षतेखाली असलेल्या कार्यकारी मंडळातील सदस्यांनी राजीनामा दिल्याने डंभारे यांचे कार्यकारी मंडळ विशेष आमसभेने बरखास्त करून नविन कार्यकारी मंडळ स्थापन करण्याचे सुचित केले. त्यानुसार ७ फेब्रुवारी २०१० ला निवडणुक प्रक्रीयेद्वारे नविन कार्यकारी मंडळ निवडण्यात आले. तसेच अध्यक्षपदी य.शा.महल्ले यांची अविरोध निवड झाली. या बदलाबाबत विद्यमान सचिवामार्फत  सहाय्यक धर्मदाय आयुक्तांकडे अर्ज करण्यात आला. मात्र त्यानंतर सचिवाने माजी अध्यक्ष निळकंठ डंभारे यांचेशी हातमिळवणी करून हा बदल अर्ज मागे घेतला. त्यामुळे सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी हा बदल खारीज करून महल्ले यांना नविन बदल अर्ज दाखल करण्याची मुभा दिली. या अर्जावरील निर्णय अद्याप प्रलंबीत आहे. मात्र माजी अध्यक्ष डंभारे व सचिवांनी या खारीज झालेल्या अर्जाचा चुकीचा अर्थ लावुन बेकायदेशीरपणे मंडळाच्या कामात ढवळाढवळ करणे सुरू केले. असा महल्ले यांचा आरोप आहे. डंभारे व गुप्ते यांचा राजीनामा आमसभेत मंजुर झाला व कार्यकारी मंडळही बरखास्त करण्यात आले. असे असतानांही माजी अध्यक्ष व सचिवांनी बनावट ठराव करून मंडळाशी संबंधीत बँकाना सादर केला. माजी सचिव शांताराम गुप्ते यांच्या नावाने खातेपालट केले. तसेच अनेकदा रकमेची उचल करण्यात आली असा आरोप करण्यात आला आहे. अशा आशयाची तक्रारही मंडळाच्या विद्यमान अध्यक्षांनी घाटंजी पोलीस स्टेशनला केली होती. मात्र पोलीसांनी याप्रकरणात कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे अखेर मंडळाचे माजी अध्यक्ष डंभारे माजी सचिव गुप्ते यांचे विरोधात बनावट दस्तावेज तयार करून रकमेची उचल करणे व संस्थेची फसवणुक करणे या सबबीखाली भा.दं.वि. कलम ४०९, ४२०, ४६५, ४६८, ४७१, ४७२ अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अखेर पोलीसाला मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

पोलीस स्टेशनच्या आवारात कॉन्स्टेबलला मारहाण करणा-या अवैध व्यावसायीकाविरोधात अखेर घाटंजी पोलीसांनी नाईलाजास्तव गुन्हा दाखल केला. सुरूवातीला कलम १८६ अन्वये कारवाई करून गुन्ह्याचे बर्कींग करणारे ठाणेदार बाबुराव खंदारे व सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरनूले यांना सदर आरोपी विरूद्ध कलम ३५३, २९४, ३२३ अन्वये गुन्हा दाखल करणे भाग पडले. मारहाणीच्या वेळी उमेश चंदन हे ड्युटीवर नव्हते तसेच त्यांनी गणवेश घातलेला नव्हता अशी कारणे देऊन स्थानिक अधिका-यानी वरिष्ठांची दिशाभुल केली होती. स.पो.नि. गुरनूले यांनी तर चंदन यांच्या फिर्यादीवर ''सदर कर्मचारी ड्युटीवर नसल्याने ही तक्रार काल्पनिक वाटते'' असा शेरा दिला होता. वास्तविक पोलीस स्टेशनच्या आवारात हा प्रकार घडला तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक परिसरात होते. पोलीस कर्मचारी विलास सिडाम व भारत कापसीकर यांनी चंदन यांना त्या आरोपीच्या तावडीतुन सोडविले होते. तरी सुद्धा गुरनूलेंना ही तक्रार काल्पनिक वाटलीच कशी याचे संशोधन होणे गरजेचे आहे. तक्रारीवर योग्य न्याय न मिळाल्यामुळे पोलीस कर्मचारी न्यायालयात जाऊ शकतो अशी शंका उत्पन्न झाल्याने, कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचा-यास मारहाण झाल्यास कलम ३५३ अन्वये कार्यवाही होऊ शकते काय अशी विचारणा घाटंजी पोलीसांनी स्थानिक न्यायालयाला केली होती अशी माहिती आहे.
एकंदरीतच हे प्रकरण घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये सुरू असलेल्या मनमानी कारभाराचे ज्वलंत उदाहरण आहे. प्रसिद्धी माध्यमांच्या दबावामुळे सदर आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची औपचारीकता पोलीसांनी केली असली तरी कायद्याचा आपल्या स्वार्थासाठी फायदा करून घेणारे ठाणेदार बाबुराव खंदारे व स.पो.नि. अरूण गुरनूले यांची या प्रकरणातील संदिग्ध भुमिका तपासणे गरजेचे आहे. हे प्रकरण फारसे गंभिर नसले तरी हा 'प्रकार' नक्कीच गांभिर्याने घेण्यासारखा आहे. पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यानी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आता पोलीस वर्तुळातूनच होऊ लागली आहे.

Monday 12 September 2011

घाटंजी बाजार समिती सभापतीपदी अभिषेक ठाकरे उपसभापतीपदी प्रकाश डंभारे

ऐनवेळी झालेल्या नाट्यमय घडामोडी नंतर घाटंजी बाजार समिती सभापती पदाची माळ अखेर आमडीचे सरपंच अभिषेक ठाकरे यांच्या गळ्यात पडली. तर उपसभापतीपदी प्रकाश डंभारे यांची निवड झाली. सभापती-उपसभापती पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत दोन्ही गटांना सारखीच मते पडल्याने ईश्वर चिठ्ठीने निवड करण्यात आली. बाजार समिती निवडणुकीत मोघे-लोणकर व अण्णासाहेब-निलेश पारवेकर या दोन मुख्य गटात निवडणुक झाली. त्यात मोघे-लोणकर गटाचे बहुमत आले. मात्र आज ना.मोघेंचे समर्थक देवानंद पवार यांनी वेगळी चुल मांडल्याने या गटात फुट पडली. सहकार क्षेत्रातील निवडणुकीत सत्तास्थापनेचा दांडगा अनुभव असलेल्या सुरेश लोणकरांनी पारवेकर गटाला हाताशी घेऊन बाजार समितीवर आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. त्यामुळे देवानंद पवार तोंडघशी पडले आहेत. नवनियुक्त सभापती अभिषेक ठाकरे हे लोणकरांचे समर्थक आहेत तर उपसभापती प्रकाश डंभारे हे पारवेकरांचे कट्टर कार्यकर्ते आहेत. आज झालेल्या निवडणुकीत लोणकर पारवेकर गटाकडून सभापतीपदासाठी अभिषेक ठाकरे तर उपसभापती पदासाठी प्रकाश डंभारे यांनी नामांकन दाखल केले होते. तर मोघे-पवार गटाकडून रमेश आंबेपवार व सचिन ठाकरे यांचे नामांकन होते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणल्या गेल्याने दोन्ही गटांच्या समर्थकांचा जीव टांगणीला लागला होता. निवडणुकीनंतर विजयी मिरवणुक काढण्यात आली. त्यामध्ये जि.प.सदस्य सुरेश लोणकर, राष्ट्रवादीचे सहकोषाध्यक्ष सतिष भोयर, माजी सभापती सचिन पारवेकर यांचेसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Sunday 11 September 2011

घाटंजीत एकाच रात्री सात घरफोड्या

नागरीकांमध्ये चोरट्यांची धास्ती
पोलीसांची तक्रार घेण्यास टाळाटाळ
सातत्याने गुन्हेगारांच्या पाठीशी उभ्या राहणा-या घाटंजी पोलीसांच्या ‘चांगुलपणाचा' फायदा चोरट्यानीही करून घेतला. एकाच रात्री प्रतिष्ठीत रहिवासी परिसरामध्ये सात घरे फोडुन चोरट्यांनी सुमारे १ लाख रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. येथिल बाबासाहेब देशमुख कॉलनी ( नृसिंह वार्ड) भागात राहणारे मोहम्मद नासिर यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटातील ५२ हजार २०० रूपयांचे सोन्याचे दागीने, ५ हजार रूपयांचे चांदीचे दागीने व ५ हजार रोख असा सुमारे ६२ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. त्यांच्या घरी दोन विद्यार्थींनी भाड्याने राहतात. चोरट्यांनी त्यांच्या खोलीचे दार बाहेरून लावुन घेतले होते. नासिर हे नेर येथे गेले असल्याने शिवसेनेचे सैय्यद फिरोज यांनी या घटनेबाबत पोलीसांना कळविले.  शहरातील घाटी परिसरात रमेश ठाकरे व राजु डंभारे यांच्या घराचे कुलूपही चोरट्यांनी तोडले. त्यापैकी डंभारे यांचे घरातील कपाटातुन १ हजार रूपये रोख लंपास केले. ठाकरे यांचे घरात चोरट्यांना काहीही हाती लागले नाही. प्राध्यापक कॉलनी मध्ये जी. एन. विरदंडे यांचे घरातुन सुद्धा चोरट्यांना काही मिळाले नाही. तर त्या बाजुलाच राहणारे एस.एन. धनवे यांचे घरातुन ३ हजार रूपयांचे चांदिचे दागीने चोरीस गेले. जेसिस कॉलनीतील रहिवासी चंद्रशेखर ठाकरे व त्यांचे घरी भाड्याने राहणारे श्री. उम्रतकर यांचेही घरात चोरटे घुसले. ठाकरे यांचेकडे काहिच सापडले नाही तर उम्रतकर यांचेकडुन दागीने व रोख असा एकुण २५ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला. सणासुदीच्या निमित्ताने बाहेरगावी गेल्याचे निमित्य साधुन चोरट्यांनी डाव साधला. चोरट्यांनी आजुबाजुला राहणा-यांचे दरवाजे बाहेरून लावुन घेतले होते हे विषेश.
या घटनेमुळे घाटंजी पोलीसांची अकार्यक्षमता पुन्हा एकदा उघड झाली आहे. एकाच रात्री सात ठिकाणी घरफोड्या झाल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. विषेश म्हणजे घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचाही आरोप करण्यात येत आहे. चोरीला गेलेल्या प्रत्येक वस्तुचे बिल द्या तरच तक्रार घेतल्या जाईल असा अजब पवित्रा घाटंजी पोलीसांनी घेतल्याने अनेकांनी तक्रार देण्याचेही टाळले. वृत्त लिहीस्तोवर स्टेशन डायरीवर एकही तक्रार नसल्याचे अमंलदार रफिक शेख (पापामियॉ) यांनी सागीतले. शिवाय या घटनेच्या सर्व तक्रारी ठाणेदारांकडे असल्याने त्याची नोंद झाली नसल्याची माहिती त्यांनी दिली.


Wednesday 7 September 2011


घाटंजीच्या पोलीसांना लागला गुन्हेगारी प्रवृत्तींशी ‘लळा’


सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रिद वाक्य असले तरी घाटंजी पोलीस दलाने मात्र आपल्या वागणुकीने खलरक्षणाय सदनिग्रहणाय असा अर्थच बदलुन टाकला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तींवर पोलीसांचा वचक असणे गरजेचे आहे. खरं तर ते पोलीसांचे प्राथमीक कर्तव्य आहे. मात्र गेल्या काही महिण्यांपासुन घाटंजी व पारवा पोलीस स्टेशन हद्दीत अनुभवास आलेल्या प्रकरणांनी पोलीसांनी सर्वसामान्य नागरीकांपेक्षा गुन्हेगारांनाच झुकते माप दिल्याचे पुढे आले आहे. घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाबुराव खंदारे तसेच सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरनूले यांनी तर कित्येक प्रकरणांमध्ये अधिकाराचा गैरवापर करून आरोपींना संरक्षण देण्याचेच काम केले आहे. कोणतीही तक्रार आली तर सर्वप्रथम ती एफ.आय.आर. केली जावी असा नियम आहे. मात्र असे क्वचितच झाल्याचे आढळते. सुमारे ९० टक्के तक्रारकर्त्यांना धमकावुन आल्यापावली परत पाठविल्या जाते असा अनुभव आहे. कायद्याची जाण असणा-यांनी आग्रह केलाच तर या ना त्या माध्यमातुन त्यांचेवर दबाव आणल्या जातो. किंवा त्यांचे विरोधात तक्रार करण्यास प्रवृत्त केल्या जाते. हा सर्व खटाटोप केल्यावर पोलीस अधिका-यांचा खिसा चांगलाच गरम झालेला असतो.
अशा अनेक प्रकरणात घाटंजी पोलीसांनी एकतर्फी कारवाई केल्याचे निदर्शनास आले आहे. वासरी येथिल भारत निर्माण योजनेतील आरोपी तब्बल दोन महिने फरार होते. त्यानंतर या घोटाळ्याची तक्रार करणा-यांवर तडकाफडकी गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या महिन्याभरात सहाय्यक पोलीस निरिक्षक गुरनूले यांनी काही जुगार अड्ड्यांवर मारलेले छापे संशयास्पदच होते. या छाप्यांदरम्यान केवळ काही जुगा-यांवरच गुन्हे दाखल करण्यात आले. अनेक प्रतिष्ठीत यातुन सराईतपणे निसटले. घाटंजी तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारू, कोंबडबाजार, मटका व जुगार मोठ्या प्रमाणावर चालतो. घाटंजी शहरात तर त्याचे दुकानच थाटले आहे. पारवा परिसरातुन मोठ्या प्रमाणावर गांज्याची तस्करी होते. या अवैध व्यावसायीकांचा घाटंजी पोलीस स्टेशनच्या अधिका-यांना एवढा लळा लागला आहे की, पोलीस अधिक्षकांचा आदेश असुनही तालुक्यात अशा व्यवसायांवर नियंत्रण आलेले नाही. उलट या आदेशामुळे हप्त्यामध्ये वाढ होऊन पोलीसांचे त्यांना सक्रिय सहकार्य लाभत आहे. केवळ थातुर मातुर कागदोपत्री कार्यवाही दाखवुन वरिष्ठांची बोळवण केल्या जात आहे. दोन दिवसांपुर्वी झालेल्या घटनेने तर पोलीसच असुरक्षीत असल्याचे निदर्शनास आले आहे. एवढेच नव्हे तर कायद्यातील खाचखळग्यांची प्रत्यक्ष माहिती असलेल्या पोलीसालाही न्यायासाठी झगडावे लागते अन तेही एका अवैध व्यावसायीकाविरोधात, हा खरच पोलीस दलाला आत्मचिंतन करायला लावणारा विषय आहे.
आपल्याच एका कनिष्ठ कर्मचा-याला पोलीस स्टेशनच्या आवारात मारहाण होते. मात्र अधिकारी त्या आरोपीवर कार्यवाही करण्या ऐवजी कायद्याची भाषा वापरून पाठीशी घालतात. यामुळे पोलीस कर्मचा-याचे मनोधैर्य तर खचेलच शिवाय गुन्हेगारांचा मस्तवालपणा नक्कीच वाढेल. पोलीसाला मारहाण करून मोकाट फिरणा-याविरोधात कुणी काही कसे बोलणार? गुन्हेगारांना संरक्षण देण्याच्या घाटंजी पोलीसांच्या ‘बाबुराव पटर्न' मुळे येणा-या काळात या भागात कायदा व सुव्यवस्थेचा गंभिर प्रश्न निर्माण होणार अशी स्पष्ट चिन्हे दिसुन येत आहेत. 
अमोल राऊत

साभार :- दै. देशोन्नती



आरोपीला ‘सॉफ्टकॉर्नर' पोलीस कॉन्स्टेबलवर ‘दबाव’


घाटंजीच्या ठाणेदाराचा अजब कारभार
पोलीस कर्मचारी मारहाण प्रकरण

पोलीस स्टेशनच्या आवारात येऊन पोलीस कॉन्स्टेबल उमेश चंदन यांना बेदम मारहाण करणारा आरोपी प्रविण उर्फ भारी पांडुरंग खैरे (वय ४०) याचेवर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने घाटंजी पोलीसांचा अनियंत्रीत कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वाहतुक पोलीसाने खैरे याच्या पुतण्याची मोटरसायकल चलान केली. यामुळे चिडलेल्या खैरेने पोलीस कर्मचारी उमेश चंदन यांना पोलीस स्टेशनच्या आवारात अडवुन सुरूवातीला हुज्जत घातली व त्यानंतर अर्वाच्य शिविगाळ करून बेदम मारहाण केली. ईतर पोलीस कर्मचा-यांनी त्यांना सोडविल्याने हे प्रकरण थोडक्यात निभावले. उमेश चंदन यांनी प्रविण खैरे व त्याचा साथिदार अनिल खैरे यांचे विरोधात तक्रार केली. मात्र सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरनूले यांनी ठाणेदार बाबुराव खंदारे यांचे आदेशावरून या आरोपी विरोधात गुन्हा दाखल न करता प्रकरण ‘चौकशीत' ठेवले. विषेश उल्लेखनिय म्हणजे गुरनूले यांनी सदर आरोपीस पोलीस कर्मचा-या विरोधात तक्रार करण्यास प्रोत्साहीत करून जातीवाचक शिविगाळ केल्याची तक्रार नोंदवुन घेतली असेही चर्चिल्या जात आहे. या घटनेची माहिती उपविभागीय अधिकारी गेडाम, जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनाही कळविण्यात आली. मात्र स्थानिक पोलीस अधिका-यांनी चंदन यांनाच तांत्रिक दुष्ट्या या प्रकरणात अडकवुन वरिष्ठांचीही दिशाभुल केल्याचे पोलीस वर्तुळात बोलल्या जात आहे. सदर आरोपी अवैध व्यवसायाशी संबंधीत असुन त्याचेवर अनेक गंभिर प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. चोरांबा परिसरात मोठ्या प्रमाणावर कोंबडबाजार चालतो. त्यातुन मोठ्या प्रमाणावर मलिदा मिळत असल्याने ठाणेदार खंदारे व स.पो.नि. गुरनूले यांनी सदर आरोपी विरोधात विषेश सहानुभूती दाखविल्याचे समजते. घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये चालणा-या या मनमानी कारभारावर उपविभागीय अधिकारी गेडाम यांचे नियंत्रण नसल्याचे सिद्ध होत आहे. पोलीस कर्मचा-याला मारहाण झाल्याच्या घटनेबाबत पोलीस स्टेशनच्या आवारात कमालीची गुप्तता पाळण्यात येत होती. बराच वेळ स्टेशन डायरी दडवुन ठेवण्यात आली होती. प्रस्तुत प्रतिनिधीने या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी संपर्वâ केला असता राजेंद्र वाढीवा या कर्मचा-याने माहिती देण्यास नकार दिला.
आज दुपारी वृत्तपत्र प्रतिनिधी या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले असता स्टेशन डायरी अमंलदार रफिक शेख (पापामियाँ) यांना ठाणेदारांनी तातडीने आपल्या निवासस्थानी बोलाविले. त्यानंतर शेख यांनी याबाबत माहिती देण्यास स्पष्ट नकार देऊन प्रकरणाचा तपास साहेबांकडे असल्याचे सांगितले. एकंदरीतच या सर्व घटनाक्रमावरून ठाणेदारांची भुमिका संशयास्पद असल्याचे दिसुन येत आहे.
या घटनेमुळे पोलीस कर्मचा-यांचे मनोधैर्य खचले असुन पोलीसच असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस स्टेशनच्या आवारात जर पोलीस कर्मचा-याला मारहाण होत असेल तर गुन्हेगारांवर यंत्रणेचा काय वचक असेल हे लक्षात येते. घाटंजी पोलीस स्टेशन गेल्या काही महिन्यांपासुन चर्चेत आले असुन येथिल अधिकारी आता वरिष्ठानांही जुमानत नसल्याचे चित्र आहे. ठाणेदार खंदारे व स.पो.नि. गुरनूले यांची आरोपींच्या बाजुनेच सहानुभूती जास्त असल्याचे अनेक प्रकरणांमध्ये दिसुन आले आहे. त्यांचा गुन्हेगारी प्रवृत्तींशी असलेला ‘लळा' असाच कायम राहिला तर या भागात कायदा व सुव्यवस्थेचा गंभिर प्रश्न निर्माण होण्याची स्पष्ट चिन्हे दिसुन येत आहे.

साभार :- दै. देशोन्नती