Pages

Sunday 31 July 2011

सहज फिरतांना दिसलेलं.......!

आयुष्याची "कसरत"


प्रत्येक बालकास शिक्षण मिळावे 
यासाठी शासनाने कायदा लागु केला. 
मात्र कायद्याने पोट कसे भरणार?
 त्यामुळेच खेळण्याबागडण्याच्या वयात हि चिमुरडी
 हातातल्या काठीसोबतच कुटूंबाचाही भार पेलत 
"तारेवरची कसरत"
 करीत आहे.


प्रेरणास्पद तरूणाई.....!

टवाळक्या करीत रस्त्यावरून वा-याच्या वेगाने हुंदडणारे तरूण नेहमीच नजरेस पडतात. मात्र शिक्षणासोबतच व्यवसाय सांभाळुन संयमाने वाटचाल करणारी तरूणाई नजरेस पडली की सुखावुन जातं.



म्हातारपण असंच असतं.......!
उतारवय आलं की जन्मदात्याना ‘वेगळं' केल्या जातं. फरक एवढाच की, 
गरिबांकडे त्यांच्यासाठी वेगळी झोपडी असते तर श्रीमंतांकडे वेगळा बंगला.


छायाचित्रण :- अमोल राऊत, घाटंजी 

Friday 29 July 2011

खुर्चीच्या प्रेमासाठी पत्नीला दिली ‘सोडचिठ्ठी'



प्रेम कधी कुणावर होईल याची शाश्वती कुणीच देऊ शकत नाही असे म्हणतात. मग त्यापुढे सामाजीक संकेताचीही पर्वा केल्या जात नाही. आपल्या सभोवताल असे किस्से घडतच असतात. मात्र कुणी सत्तेच्या खुर्चीवर बसण्यासाठी जन्मजन्मांतरीच्या बंधनालाच कात्री लावत असेल त्याला काय म्हणावे. मात्र आजच्या युगात हे घडतंय हि आत्मचिंतनाची बाब आहे. घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत नामांकन रद्द झालेल्या उमेदवारांनी निवडणुक रिंगणात राहण्यासाठी अशा युक्त्या वापरल्याने ‘सत्तेसाठी वाट्टेल ते' चा प्रत्यय येत आहे. बाजार समितीत विद्यमान संचालक असलेल्या एका उमेदवाराचा नामांकन अर्ज छाननी दरम्यान रद्द झाला. पत्नीच्या नावाने अडत परवाना असल्यामुळे त्यांनी जुन्या मुद्रांकाच्या आधारे पत्नीशी एक वर्षापुर्वीच घटस्फोट झाल्याचे दाखविले. त्याचप्रमाणे एकेकाळी बाजार समितीच्या सभापतीपदी असलेल्या एका उमेदवाराचा अर्ज मुलाच्या नावे अडत परवाना असल्याने अवैध ठरविण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी अविवाहीत मुलाला कागदोपत्री चक्क घराबाहेर काढले. एकंदरीतच मानवी भावनांना छेद देणा-या अशा घटनांमुळे समाजात एक वेगळाच संदेश जात आहे. एखादी गोष्ट कायद्याच्या चौकटीत बसविण्यासाठी अशा पळवाटा शोधणा-या वकीली मेंदुचे कौतुकच करावे लागेल. कागदोपत्री घटस्फोटाने ते वेगळे झाले नाहीत किंवा त्या मुलाने वेगळा संसार थाटला नाही. परंतु या कागदी उठाठेवीमुळे आपला वैचारीक स्तर किती खालावलेला आहे याचा प्रत्यय येतो.  नातेसंबंधाला काटेकोरपणे जपणा-या आपल्या समाजात आता अशा घटना होऊ लागल्याने येणा-या काळात आणखी काय बघावे लागेल 
याचा नेम नाही.

अखेर बाजार समितीच्या दिग्गजांना दिलासा

घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत नामांकन अर्ज छाननीदरम्यान दोन्ही प्रमुख गटांची भिस्त असलेल्या दिग्गज उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. निवडणुकीबाहेर झालेल्या १७ पैकी ८ उमेदवारांनी त्याविरोधात अपील केले होते. जिल्हा उपनिबंधकांनी निवडणुक निर्णय अधिका-यांचा आदेश रद्द करून त्यांचे अर्ज कायम ठेवल्याने मोघे-लोणकर व पारवेकर गटाला दिलासा मिळाला आहे. आशिष लोणकर, प्रकाश डंभारे, सुरेश भोयर, चंद्रप्रकाश खरतडे, पांडूरंग सिदुरकर, माया पवार, इकलाख खान हे निवडणुकीत कायम राहिल्याने दोन्ही प्रमुख गटांवर आलेले संकट टळले आहे. सचिन पारवेकर व सैय्यद रफिक यांचे अर्ज छाननीमध्ये मंजुर झाले होते. मात्र त्यांच्या उमेदवारीविरोधात जिल्हा उपनिबंधकांकडे अपील करण्यात आले होते. मात्र ते फेटाळण्यात आले. आता १ ऑगस्टला नामांकन परत घेण्याची अंतिम तारीख असुन त्याचदिवशी चिन्ह वाटप होणार आहे.

दिड महिन्यांपासुन फरार आरोपीस औपचारीक अटक

भारत निर्माण योजनेत १२ लाख रूपयांची अफरातफर करून मोकाट फिरत असलेल्या आरोपीला अटक करण्याची औपचारीकता अखेर पोलीसांना पुर्ण करावी लागली. राजकीय दबावातुन या प्रकरणात एकतर्फी कार्यवाही करणा-या घाटंजी पोलीसांनी आरोपी दत्ता देवसिंग जाधव याला वासरी येथुनच अटक केली. 
अटकेनंतर न्यायालयाने त्याला तिन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. मात्र कथितपणे त्याच्या छातीत दुखायला लागल्याने यवतमाळ येथिल रूग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्याचेवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणात अगदी सुरूवातीपासुनच यंत्रणा घोटाळेबाजांची साथ देत आहे. भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार १० मार्चला वासरीच्या सरपंच प्रियंका प्रशांत धांदे यांनी केली होती. जिल्हा परिषदेच्या उपविभागीय अभियंत्यानी केलेल्या चौकशीत सुमारे १२ लाखांचा अपहार झाल्याची बाब पुढे आली. तसा अहवालही जिल्हा परिषदेला पाठविण्यात आला. मात्र जिल्हा परिषदेचा ‘असहकार' व पोलीसांची जाणुनबुजून दिरंगाई यामुळे या प्रकरणात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यास चार महिन्यांचा कालावधी लागला. ३ जुन रोजी पोलीसांनी तक्रार घेतली. त्यानंतर ९ जुन रोजी आरोपी दत्ता देवसिंग जाधव, व सखुबाई पांडुरंग कचाडे या दोघांवर गुन्हा दाखल झाला. कनिष्ठ व सत्र न्यायालयात अटकपुर्व जामिन नामंजुर झाल्यावर आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने आरोपी सखुबाई कचाडे हिचा जामिन मंजुर केला व दत्ता जाधव याचा जामिन अर्ज फेटाळण्यात आला. या दिड महिन्याच्या कालावधीत हे दोन्ही आरोपी पोलीस दप्तरी फरार होते.
जामिन मंजुर झाल्यानंतर एक दोन दिवसातच सखुबाई कचाडे हिचा ह्नदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मात्र सदर महिलेचा मृत्यू तक्रारकत्र्यांनी धमकावल्यामुळे झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलीसांनी कोणतीही चौकशी न करता गुन्हे दाखल केले. पोलीसांच्या एकतर्फी कार्यवाहीबाबत देशोन्नती मध्ये वृत्त प्रकाशीत झाल्याने वरिष्ठांनी घाटंजीच्या ठाणेदाराची चांगलीच कान उघाडणी केली. अखेर पोलीसांना आरोपीस अटक करणे भाग पडले. विषेश म्हणजे हा आरोपी तिन दिवसांपासुन वासरी येथे होता.
घाटंजीमध्येही त्याने बिनधास्तपणे फेरफटका मारला. काही ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनला याबाबत कळविले. मात्र पोलीस खात्यातील वरिष्ठांपेक्षा 
राजकीय नेत्याचा आदेश महत्वाचा मानणा-या घाटंजी पोलीसांनी तिकडून हिरवी झेंडी न मिळाल्यामुळे आरोपीस अटक केली नाही. अटक झाल्यावरही एखाद्या मोठ्या राजकीय घोटाळेबाजाप्रमाणे त्याची पोलीस कोठडी ऐवजी दवाखान्यात रवानगी करण्याची ‘व्यवस्था' करण्यात आली. एकंदरीतच या प्रकरणामुळे शासकीय निधीचा निर्भिडपणे अपहार, त्याला यंत्रणेची असलेली साथ व पोलीसांचा मनमानी कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

घाटंजीचे ग्रामदैवत संत श्री. मारोती महाराज


ब्रम्हलीन परमहंस श्री. मारोती महाराज व श्री. तुकाराम महाराज हे घाटंजी शहराचे ग्रामदैवत आहे. दरवर्षी त्यांच्या नावाने घाटंजीत माघ वद्य प्रतिपदा ते वद्य अमावस्या पर्यंत भव्य यात्रा भरते. मारोती महाराजांच्या घाटंजीतील अवतरणाचा इतिहास फार जुना आहे. दि. २५ फेब्रुवारी १९४९ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी मारोती महाराज घाटंजीत प्रकट झाले. 
महाराजांचा जन्म तामसा नदिच्या तिरावर असलेल्या पिंपळगावात सन १८९२ साली सप्टेंबर महिन्यात झाला. पिता बळीरामजी चिवरकर व आई रेणुकाबाई यांचे ते खुप लाडके होते. महाराजांना शाळेत जाणे मुळीच आवडत नसे. ते शाळेला दांडी मारून नदिच्या वाळूत बसुन रहात असत. शाळेची घंटी होताच ते घरी जात. मात्र तरी देखील दरवर्षी ते परिक्षेत पास व्हायचे. त्यांचे वडील कोंडवाड्यात कारकुन होते. महाराजांचे ७ व्या वर्गापर्यंत शिक्षण झाल्यावर ते दापोरी खुर्द येथे शिक्षक पदी रूजू झाले. त्यानंतर त्यांच्या घरी लग्नाची बोलणी सुरू झाली. मात्र त्यांनी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. या काळातच त्यांनी सिद्धांत बोध ग्रंथ वाचला. त्यानंतर त्यांचे मन:परिवर्तन झाले. आईवडीलांचा मृत्यु झाल्यानंतर १९२७ मध्ये सावत्र आई यमुनाबाई यांच्याजवळ मंगरूळपीर तालुक्यातील इंझोरी येथे राहण्यास गेले. तेथे असलेल्या शिंपीनाथ बाबांच्या समोर असलेल्या निंबाच्या झाडावरच ते रात्रंदिवस राहु लागले. या काळात त्यांनी अन्नग्रहण केले नाही. कधी कधी ते धामणगाव देव येथे मुंगसाजी महाराजांच्या भेटीसाठी जात असत. एकदा मुंगसाजी महाराजांनी 
त्यांना भिंतीच्या खांडावर बसण्यास सांगीतले. सुमारे १३ दिवसपर्यंत बाबा तेथेच बसुन होते. या काळात मुंगसाजी महाराज त्यांना चटणीचे गोळे खायला देत असत. या परिक्षेत मारोती महाराज खरे उतरल्याने मुंगसाजी महाराज त्यांच्यावर प्रसन्न झाले. 
या दरम्यान दारव्हा पुसद भागात भ्रमण करतांना अनेकांना बाबांच्या दैवी शक्तींचा साक्षात्कार झाल्याने त्यांच्या शिष्यांमध्ये वाढ होऊ लागली. दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले लोक बाबांना शरण येत असत. एकदा मरणासन्न अवस्थेत असलेल्या बालकाला त्यांचेकडे आणले असता त्यांनी त्याचे तोंडात एक गोटा कोंबला. त्यामुळे ते बालक मरण पावले. त्या बालकाचे आई वडील संतप्त झाले. त्यांनी पोलीसात तक्रार दिली. पोलीस आल्यावर बाबांनी पोलीसांना शिव्या दिल्या व म्हणाले कोण म्हणतो ते बालक मृत आहे? असे बोलुन त्यांनी तोंडातील गोटा काढला. अन चमत्कार असा की ते मुल रडायला लागले. विषेश म्हणजे ते मुल सर्व व्याधींपासुन मुक्त झाले होते. तेव्हापासुन त्या मुलाचे आईवडील व इतर अनेक लोक बाबांचे निस्सिम भक्त झाले. १९४६ मध्ये मुंगसाजी महाराज मुंबईला गेल्यावर मारोती महाराज घाटंजी नगरीत आले. 
यवतमाळ जिल्ह्यात फिरत असतांना अनेक लोक त्यांची सेवा करू लागले. घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सचिव डी.पी. पेटकर व गणपतराव भोसले यांची बाबांवर श्रद्धा होती. माघ वद्य १३ रोजी २५ फेब्रुवारी १९४९ रोज शुक्रवार ला महाशिवरात्रीच्या दिवशी श्रवण नक्षत्रावर दुपारी बाराच्या सुमारास बाबा घाटंजीत आले. बाबांचे भक्त पेटकर व भोसले यांनी बाबांना रामचंद्र भोंग यांच्या घरी थांबवीले. आजही भोंग यांच्या निवासस्थानी बाबांचे ठाणे असुन बाबा बसायचे त्या बंगळीवर पादुका ठेऊन आहेत.
घाटंजीत घालविलेल्या काळात बाबांच्या शक्तीमुळे अनेक लोक त्यांचे भक्त होऊ लागले. घरोघरी त्यांची पुजा होत होती. बाबा घाटंजीत आले तेव्हा त्यांचेकडे पाहुन हा कुणी संत आहे का यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता. मात्र लोकांना आलेल्या अनुभूतीवरून त्यांच्या दैवी शक्तीची प्रचीती आल्याने ते घाटंजीकरांचे दैवत बनले. बाबांच्या चमत्कारांची किर्ती सर्वदुर पसरायला लागली. मसुद संस्थानचे राजेसाहेब बाबांच्या दर्शनाकरीता आले. शिवाय बडोदा संस्थानच्या राणी सुद्धा घाटंजीत आल्या. त्यावेळी त्यांनी पायदळ संपुर्ण गावातुन फेरफटका मारला. त्यानंतर बाबांचे दर्शन घ्यायला दुरदुरचे लोक यायला लागले. दि, ११ ऑक्टोबर १९५३ रोजी कामठवाडा येथे चंपत पाटील यांच्या घरी बाबांच्या परमभक्त लोढीनबाई यांच्या मांडीवर डोके ठेऊन मारोती महाराजांचे निर्वाण झाले. त्यावेळी घाटंजी येथुन पेटकर, भोसले, पुरणसिंग बैस, रामचंद्र भोंग यांच्यासह सुमारे शेकडो लोक दिंड्या घेऊन कामठवाडा येथे गेले. तिथुन बाबांचे पार्थिव घाटंजी येथे आणण्यात आले. येथे समाधी देऊन त्या ठिकाणी मंदिर उभारण्यात आले. तेव्हापासुन दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवसापासुन घाटंजीत संत श्री मारोती महाराजांची भव्य यात्रा भरविण्यात येते. लाखो भाविक या दरम्यान महाराजांच्या दर्शनासाठी येतात. घाटंजीचे ग्रामदैवत म्हणुन संत श्री मारोती महाराजांचा लौकीक आहे. तसेच संत तुकाराम महाराजांचेही याच ठिकाणी मंदिर आहे.

एम.एस.सी.आय.टी. परिक्षेत जलाराम कॉम्प्युटरच्या विद्यार्थ्यांची उज्वल कामगीरी

पुर्वा ठाकरे हिला १०० टक्के गुण



महाराष्ट्र जान महामंडळातर्फे  नुकत्याच घेण्यात आलेल्या एम.एस.सी.आय.टी.च्या परिक्षेत येथिल जलाराम कॉम्प्युटरच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम राखत कौतुकास्पद कामगीरी केली आहे. पुर्वा प्रमोद ठाकरे या विद्यार्थीनीने १०० टक्के गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. त्यापाठोपाठ शिवाणी मधुकर निस्ताने, अविनाश वेंकटेश पटकुरवार यांना ९९ टक्के, तेजस दिलीप भट ला ९८ टक्के व विधी जमनादास सुचक, कल्याणी सुरेंद्र अवधुतकार, भाग्यशाली ज्ञानेश्वर लेनगुरे यांना ९७ टक्के गुण मिळाले आहेत.
यातील बहुतांश विद्यार्थी शालेय आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय जलाराम इन्स्टीट्युटचे संचालक व मार्गदर्शक हर्षद दावडा यांना दिले आहे. या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगीरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Wednesday 27 July 2011

लाखोंच्या घोटाळ्यातील आरोपीचा मृत्यू


नातेवाईकांचा रोष तक्रारकर्त्यांवर

एक आरोपी अद्यापही फरारच

घाटंजी पोलीसांची दुटप्पी भुमिका


भारत निर्माण योजनेत लाखोंच्या अपहाराचा आरोप असलेल्या योजनेच्या सचिव सखुबाई पांडुरंग कचाडे यांचा ह्नदयविकाराच्या झटक्याने अकस्मात मृत्यू झाला. त्यांना नुकताच उच्च न्यायालयाकडुन अटकपुर्व जामिन मंजुर झाला होता. वासरीचे माजी सरपंच व योजनेचे अध्यक्ष दत्ता देवसिंग जाधव आणी मृतक सखुबाई कचाडे यांच्यावर भारत निर्माण योजनेत सुमारे १२ लाखांची अफरातफर केल्याचा आरोप आहे.
जिल्हा परिषदेच्या उपविभागीय अभियंत्यांनी केलेल्या चौकशीत अपहार झाल्याची बाब सिद्ध झाली होती. मात्र त्यानंतर घोटाळ्यांना प्रोत्साहन देणा-या स्थानिक जि.प.सदस्याचा दबाव व घाटंजी पोलीसांच्या ‘कठपुतली' कारभारामुळे गुन्हा दाखल होण्यास तब्बल चार महिन्यांचा कालावधी लागला. आपल्या गॉडफादरच्या आदेशा शिवाय कोणतेही काम न करणा-या घाटंजी पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराने दिड महिन्यांपासुन आरोपींना अटक केली नाही. या आरोपींचा अटकपुर्व जामिन दोन वेळा नामंजुर झाला. शेवटी उच्च न्यायालयात सखुबाई कचाडे यांना जामिन मिळाला. मात्र दत्ता जाधव याचा अटकपुर्व जामिन फेटाळण्यात आला. एवढा कालावधी होऊनही घाटंजी पोलीसांना आरोपी सापडत नाहीत हे संशयास्पदच आहे. 
आरोपी दत्ता जाधव हा आतापर्यंत त्याच्या माहुर येथिल नातेवाईकाकडे राहात होता. घाटंजी पोलीसानांही ही माहिती होती.  मात्र राजकारण्यांच्या ‘खुट्याला’ बांधुन असल्याने पोलीस त्याला अटक करीत नसल्याची चर्चा आहे. या दोन्ही आरोपींवर भा.दं.वि.च्या ४४६,४०९,४२०,४७७ (अ),४६९,३४ कलमान्वये गुन्हा दाखल आहे. म.न.से.चे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांनी या प्रकरणाची तक्रार केली होती. अपहारातील आरोपी सखुबाई कचाडे यांच्या नातेवाईकांनी या मृत्यूस तक्रारकर्ते जबाबदार असल्याचा आरोप केला असुन तशी तक्रारही घाटंजी पोलीस स्टेशनला केली आहे. 
घाटंजी पोलीसानी अत्यंत तत्परतेने वासरीच्या विद्यमान सरपंच प्रियंका प्रशांत धांदे, उपसरपंच श्रीहरी सुर्यकांत निबुधे, प्रशांत भाऊराव धांदे, अशोक सुर्यकांत निबुधे, भोपीदास हेमला राठोड यांचेविरूद्ध भा.दं.वि.च्या ३०६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तक्रारकर्त्यांनी कथितपणे धाकदपट केल्याचा त्यांचा आरोप आहे. विषेश उल्लेखनिय म्हणजे या अपहारातील दोन्ही आरोपी तक्रार केल्यास आत्महत्या करून त्यास ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व सचिवांना जबाबदार धरण्याची धमकी देत होते. अशा आशयाची लेखी तक्रार वासरी ग्रा.पं.च्या ठरावासह ८ मार्च रोजीच करण्यात आली होती. एकंदरीतच घाटंजी पोलीसांचा कारभार आता बेलगाम झाला असुन वरिष्ठांचे त्यावर नियंत्रण नसल्याचेच विवीध घटनांवरून सिद्ध होत आहे.


पोलीस अधिक्षकांकडून ठाणेदाराची कान उघाडणी

लाखो रूपयांच्या अपहार प्रकरणात राजकीय आदेशावरून आरोपींना संरक्षण देणारे घाटंजीचे ठाणेदार बाबुराव खंदारे यांची नुकतेच रूजू झालेल्या पोलीस अधिक्षकांनी चांगलीच कान उघाडणी केल्याची माहिती आहे. या घोटाळ्यातील महिला आरोपीचा मृत्यू झाल्यावर राजकीय दबावातुन  तक्रारकर्त्यांविरोधातच तडकाफडकी गुन्हे दाखल केले होते. एरवी अशा प्रकरणात दिवसेंदिवस तक्रार चौकशीत ठेवणा-या घाटंजी पोलीसांनी गुन्हे दाखल करण्याची घाई केली यावर पोलीस अधिक्षकांनी ठाणेदाराला धारेवर धरून प्रकरणातील आरोपी एवढे दिवस फरार कसे याचाही जाब विचारल्याची माहिती आहे. म.न.से.च्या शिष्टमंडळाने याबाबत पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन या प्रकरणात योग्य चौकशी करण्याची मागणी केली.

धनादेश अनादर प्रकरणी संस्थाचालक आशिष गेडामला अटक



न्यायालयीन कोठडीत रवानगी

तालुक्यातील महाकाली आदिवासी विकास संस्थेचे संचालक व माजी आमदार देवराव गेडाम यांचे चिरंजीव आशिष गेडाम यांना आज पहाटे अटक करण्यात आली. धनादेश अनादर प्रकरणी न्यायालयात त्यांचेवर खटला चालु आहे. तारखेवर गैरहजर असल्यामुळे येथिल न्यायालयाने त्यांचेवर अटक वॉरंट बजावला. त्यामुळे आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास यवतमाळ येथिल निवासस्थानावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले. जामिन नाकारून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली .
सन २००० साली विधानसभेची निवडणुक लढविण्यासाठी त्यांनी मुरली येथिल पंकेश वसंतराव वारकड यांच्याकडून २.५० लाख रूपये उसणे घेतले होते. त्यानंतर गेडाम यांनी या पैशाची परतफेड करण्यासाठी १ लाख व १ लाख ३० हजार रूपयांचे आय.सी.आय.सी.आय. बँकेचे दोन धनादेश वारकड यांना दिले होते. वारकड यांनी यवतमाळ अर्बन बँकेच्या घाटंजी शाखेत हे धनादेश जमा केले. मात्र खात्यात रक्कम नसल्याने धनादेश परत आले. त्यामुळे २० फेब्रुवारी २००९ रोजी निगोशीएबल ईन्स्ट्रूमेंट अक्ट १३८ अन्वये खटला दाखल केला. गेडाम हे नेहमीच तारखेवर गैरहजर राहात असत. यापुर्वी १० सप्टेंबर २००९ रोजी सुद्धा त्यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांची जामिनावर सुटका झाली होती. यावेळी पुन्हा ते तारखेवर गैरहजर असल्याने न्यायालयाने अटक वॉरंट बजावला. त्यामुळे पोलीसांनी यवतमाळ येथिल निवासस्थानातुन त्यांना ताब्यात घेतले. आज दुपारी न्यायालयापुढे त्यांना हजर करण्यात आले. गेडाम यांचा जामिन अर्ज फेटाळुन त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असुन यवतमाळ मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. आशिष गेडाम यांच्या तालुक्यात चार संस्था असुन बेरोजगार युवकांकडुन नोकरीसाठी पैसे घेऊन फसवणुक केल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत.
वारकड यांच्या वतीने अ‍ॅड गणेश धात्रक व गेडाम यांच्या वतीने अ‍ॅड महेंद्र ठाकरे व अ‍ॅड प्रेम राऊत यांनी युक्तीवाद केला

Monday 25 July 2011

अखेर ना.मोघेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल


राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व आपल्या भागाचे लोकप्रतिनिधी ना.शिवाजीराव मोघे, त्यांचा पुतण्या विजय मोघे व तत्कालीन स्वीय सहायक देवानंद पवार या तिघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून वडगाव पोलिसांनी भादंविच्या ४२०, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घाटंजी तालुक्यातील कुर्लीचे सरपंच अयनुद्दीन सोळंकी यांनी न्यायालयात केलेल्या तक्रारीवरून  प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी केदार कुलकर्णी यांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंद करून ६० दिवसांत प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. सोळंकी यांच्या तक्रारीनुसार माध्यमिक आश्रम शाळा व अध्यापक विद्यालयाच्या परवानगीसाठी सोळंकी यांच्याकडून शिवाजीराव मोघे, विजय मोघे, देवानंद पवार यांनी ४२ लाख रुपये घेतले आहे. मात्र परवानगी काढून न देता सोळंकी यांची फसवणूक आणि विश्वासघात केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सामाजीक न्याय मंत्र्यांविरोधात चक्क ४२० चा गुन्हा दाखल झाल्याने घाटंजी तालुक्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. या वृत्ताची दखल ईलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांसह राष्ट्रीय वृत्तपत्रानी घेतल्यामुळे मोघे पावसाळी अधिवेशनाच्या काळात चांगलेच अडचणीत आले आहेत.


See The Links For More News
आश्रमशाळा मान्यतेसाठी सामाजीक न्याय मंत्री 
शिवाजीराव मोघेंनी घेतले होते ४२ लाख

घाटंजी News



मित्रांनो आभार........!


बोटावर मोजण्याईतक्या दिवसात घाटंजी न्युजने १००० वाचकांचा टप्पा गाठलाय. घाटंजीपासुन दुर असलेल्याना  आपले गाव आपल्या मातीशी जुळून राहता यावे यासाठीच यासाठीच आमचा हा प्रयत्न आहे. आपले मार्गदर्शन, सुचना व सहकार्य आम्हास अपेक्षीत आहे.

घाटंजीकर व ईतर सर्व हितचिंतकांचे मनस्वी आभार............!







Myspace Graphics at 123glitter.com

Sunday 24 July 2011

अपेक्षा पवार महाविद्यालयातुन प्रथम


येथिल अपेक्षा रंगलाल पवार या विद्यार्थीनीने अभियांत्रीकी पदविका परिक्षेत महाविद्यालयातुन प्रथम क्रमांक पटकावला. ती शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालय, यवतमाळची विद्यार्थीनी आहे. तिला प्रथम वर्षाला ८२ टक्के गुण मिळाले आहेत. घाटंजी पोलीस स्टेशनला कार्यरत रंगलाल पवार यांची ती मुलगी आहे. ती आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व गुरूजनांना देते.




सा.बां. विभागाच्या दुर्लक्षामुळे नेहरू नगरात साचले तळे
येथिल बसस्थानकानजीक असलेल्या नेहरू नगरातील भागात रस्त्यालगतच्या नालीचे बांधकाम न झाल्यामुळे तळे साचले असुन नगरिकांना ये-जा करणे अशक्य झाले आहे. नेहरू नगरात सा.बां. विभागाच्या अखत्यारीत असलेला रस्ता आहे. या रस्त्यालगत असलेल्या नालिचे बांधकाम गेल्या काही वर्षापासुन रखडलेले आहे. हा रस्ता आता अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. त्यामुळे या भागात नेहमीच सांडपाण्याचे डबके साचलेले असते. पावसाळ्यात तर याला तळ्याचे स्वरूप येते. विद्यार्थी, महिला, बसस्थानकावरील प्रवासी यांना जीव मुठीत घेऊन या डबक्यातुन ये-जा करावी लागते. या भागातील नागरीकांनी याबाबत अनेकदा सा.बां.विभागाच्या अधिका-यांना कळविले तेव्हा उडवाउडविची उत्तरे देण्यात येतात. विषेश म्हणजे याच भागातुन पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन सुद्धा गेली आहे. त्यामुळे हे दुषीत पाणी यात मिसळले जाऊन नागरीकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. घाटंजी पारवा रस्त्यालगतच्या या नालिचे त्वरीत बांधकाम करावे अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा नेहरू नगरातील नागरीकांनी संबंधीतांकडे केलेल्या तक्रारीत दिला आहे.


ताल निनाद संगित क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे सुयश

अखिल भारतिय गांधर्व संगित महाविद्यालयाच्या परिक्षेत येथिल ताल निनाद संगित क्लासेसच्या विद्याथ्र्यानी तबला वादन विषयात घवघवीत यश संपादन केले. प्रारंभिक तबला वादन परिक्षेत प्रतिक ताटेवार, राजकुमार पांडे, नवनित ढोणे, विवेक कुमरे, कुणाल पवार, प्रज्वल बढाये, ऋषीकेश देवसरकर, अभिजित राठोड, संस्कार ठमके, ऋग्वेद टोम्पे, पुष्कर राऊत, राज पांढारकर, अनिकेत झाडे, अमित पाटील, देवांशू भाटी, जुही पांडे, गायत्री उईके, काजल दानखेडे, या विद्याथ्र्यानी विषेश योग्यता प्राप्त केली. तसेच चारूदत्त पुनसे, ऋषिकांत र्इंगळे, आदित्य कांडेलकर, प्रबुद्ध वाहुके, पार्थ खुणे, हिमांशु भोरे, सनन घोडाम, चिन्मय कांबळे, आदर्श उमरे, कौस्तुभ मोहितकर, नचिकेत राठोड, या विद्याथ्र्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. प्रवेशीका प्रथम मध्ये यश पोटपिल्लेवार, वेदांत वसतकर या विद्याथ्र्यानी प्राविण्य प्राप्त केले. हे विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय तबला शिक्षक रवि शेंडे यांना देतात.

घाटंजी तालुक्याची ओळख असलेले अंजीचे प्राचीन नृसिंह मंदिर



घाटंजी शहरापासुन सुमारे ३ किलोमीटर अंतरावर असलेले अंजी हे गाव केवळ विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रालगतच्या राज्यांमध्येही सर्वदुर प्रसिद्ध आहे. पुर्वीचे कुन्तलापूर व आजचे अंजी हे गाव ओळखल्या जाते ते येथे असलेल्या प्राचिन व जागृत नृसिंह मंदिरामुळे. सुमारे एक हजार वर्षांचा इतिहास असलेल्या या हेमाडपंथी मंदिरात भगवान नृसिंहाची गंडगी शिळेच्या पाषाणाची मुर्ती विराजमान आहे. अंजी या गावाला पुरातन इतिहास आहे. कुन्तलापूर (अंजी) चा चंद्रहास नावाचा राजा होता. चंद्रहास राजाचा इतिहास असा की, केरळ देशाचा राजा प्रसोभ याचा शत्रुंनी युद्धभुमीवर वध केला. त्यामुळे त्याच्या सर्व राण्या सती गेल्या. त्यावेळी राजाला चंद्रहास नावाचा दोन महिन्यांचा मुलगा होता. अनाथ झालेल्या चंद्रहासला त्याची दाई कुन्तलापूरला घेऊन आली. ती भिक्षा मागुन बालकासह आपले उदरभरण करीत असे. काही काळाने ती दाई मरण पावली. त्यानंतर चिमुकला चंद्रहास उपाशी तापाशी नगरात फिरत असे. त्याच्या चेह-यावरील राजघराण्याचे तेज व सौंदर्य पाहुन लोक त्याला अन्नवस्त्र देत असत. एकदा खेळता खेळता त्याला शालीग्राम (नृसिंह)ची मुर्ती सापडली. तो त्याची नित्यनेमाने पुजा करायला लागला. पुजेनंतर तो ती मुखात ठेवत असे. अंजी (कुन्तलापूर) चा राजा कुन्तलेश्वर होता. त्याचा दुष्टबुद्धी नावाचा प्रधान होता. त्यांनी एकदा ब्राम्हणभोज ठेवला असता चिमुकला चंद्रहास प्रधानाला रस्त्यावर खेळताना दिसला. त्याला चंद्रहासची दया आली. त्याला कडेवर घेऊन भोजनाला आणले. भोजन झाल्यावर चंद्रहास प्रधानाच्या मांडीवर बसला होता. त्यावेळी ब्राम्हणांनी मंत्राक्षता टाकुन त्याला आशीर्वाद दिला की, हा पुत्र हे राज्य चांगल्या रितीने चालवेल. प्रधान हे वाक्य ऐकुण मनोमन नाराज झाला. त्याला त्या बालकाप्रती असुया वाटायला लागली. त्याने चंद्रहासला संपविण्याचा निर्धार केला. त्याला ठार करण्यासाठी दुराचा-यांना पाचारण करण्यात आले. मारण्यासाठी शस्त्र उपसताच चंद्रहासने मुखातुन नृसिंहाची मुर्ती काढुन मदतीसाठी धावा केला. परमेश्वर भक्ताच्या रक्षणार्थ तेथे अवतरले. चंद्रहासला त्या संकटातुन सोडवले. पुढे हाच चंद्रहास कुन्तलापूर नगरीचा राजा झाला. त्याने अंजी येथे विष्णुपाषाणाची नृसिंह मुर्ती बसविली अशी आख्यायीका आहे.
पुर्वमुखी असलेल्या या मुर्तीची उंची साडेचार फुट आहे. मुर्तीच्या मस्तकावर किरीट आहे. मस्तकाच्या मागे प्रभावळ असून त्यावर दशावताराच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. संपुर्ण भारतात केवळ अंजी येथे अष्टभुजा असलेली नृसिंहाची मुर्ती आहे. हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म आहे. तर दोन हातांनी मांडीवर घेतलेल्या हिरण्यकश्यपुचे पोट विदारण केलेले आहे. मुर्तीचा एक हात हिरण्यकश्यपुच्या शेंडीकडे व एक हात पायाकडे आहे. पायाकडील बाजुला डावीकडे लक्ष्मी व उजवीकडे भक्त प्रल्हादाची मुर्ती आहे. त्याच्याच बाजुला कयाधु व भगवान शंकराची मुर्ती आहे. नृसिंहाची ही मुर्ती उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना आहे. मंदीराच्या पुर्वेकडील भिंतीवर एक झरोखा आहे. या झरोक्यातुन सकाळी सुर्याची किरणे थेट नृसिंह मुर्तीचे चरणस्पर्श करतात.
वैशाख महिण्यात येथे सतत दहा दिवस नृसिंह जन्माचा कार्यक्रम आयोजीत करण्यात येतो.
या दहा दिवसात लाखो भक्त अंजी येथे येतात. या निमित्य काढण्यात येणा-या मिरवणुकीच्या वेळी गावात अत्यंत मांगल्यमय वातावरण असते. प्रत्येक घरासमोर मिरवणूकीच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढलेल्या असतात. नृसिंह मंदिराचे व्यवस्थापन १८६५ पासुन  चोपडे घराण्याकडे आहे. वारसा पद्धतीप्रमाणे सन १९४० ते २००४ पर्यंत कै. मोहनीराज नारायणराव चोपडे हे श्री. नृसिंह देवस्थानाचे विश्वस्त होते. त्यानंतर त्यांचे जेष्ठ चिरंजीव कै. अनंत मोहनीराज चोपडे यांनी ही जबाबदारी सांभाळली. सध्या गोपाल अनंतराव चोपडे हे मंदिराचे विश्वस्त म्हणुन काम पाहात आहेत.

  

Saturday 23 July 2011

अयनुद्दीन सोळंकी यांचे विरोधात गुन्हा दाखल


तालुक्यातील कुर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच अयनुद्दीन सोळंकी यांचेविरोधात पारवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. जि.प.सदस्य जयप्रकाश काटपेल्लीवार यांचेविरोधात कथितपणे खोटी तक्रार करून बदनामी केल्याचा आरोप त्यांचेवर ठेवण्यात आला आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी गेडाम यांनी चौकशी करून पारवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. विषेश म्हणजे अयनुद्दीन सोळंकी यांनी १८ जुलै रोजी घाटंजीच्या प्रथमश्रेणी न्याय दंडाधिका-यांकडे या प्रकरणी जयप्रकाश काटपेल्लीवार यांचेविरोधात कलम १५६ () अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी अपील केले आहे. तसेच यापुर्वी ना.शिवाजीराव मोघे यांचेविरोधातही फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे

मटका अड्ड्यांवर गुन्हे शाखेचा छापा

शहरात घाटंजी पोलीसांच्या मार्गदर्शनात खुले आम सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला. यामध्ये शंकर मारोती नगराळे, जयवंत बळीराम निकम यांचेकडून २ हजार १० रूपये व सुरेश नथ्थु बडे, गजानन येणेवार यांचेकडून २ हजार १०० रूपये जप्त करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. या कार्यवाहीनंतर घाटंजी पोलीसांना जाग येऊन त्यांनीही एका अड्ड्यावर छापा मारला. त्यात संदिप वसंता साबापुरे याला वरली मटका साहित्य व केवळ ८५ रूपयांसह ताब्यात घेण्यात आले. काही दिवसांपुर्वी स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारला होता. मात्र त्यावेळी त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले होते. पोलीस कार्यवाहीची आतली खबर अवैध व्यावसायीकांना कोण देतो याची चौकशी करणे गरजेचे आहे.

Friday 22 July 2011

आश्रमशाळा मान्यतेसाठी सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघेंनी घेतले होते ४२ लाख



कुर्लीच्या सरपंचांनी केली फसवणुकीची तक्रार


















आदिवासी माध्यमीक आश्रमशाळा व डि. एड. कॉलेजला मान्यता मिळवुन देण्यासाठी सामाजीक न्याय मंत्री ना. शिवाजीराव मोघे, विजय मोघे, तत्कालीन स्विय सहाय्यक देवानंद पवार यांनी ४२ लाख रूपये घेऊन पैसे हडप केल्याची तक्रार घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथिल सरपंच अयनुद्दीन सोळंकी यांनी केली आहे. पारवा पोलीस स्टेशन व वडगाव रोड पोलीस स्टेशन यवतमाळ येथे ही तक्रार दाखल करण्यात आली असुन पोलीस तपास सुरू आहे.
२००१ साली ना. मोघे परिवहन, रोजगार व स्वयंरोजगार खात्याचे मंत्री असताना त्यांच्या तत्कालीन स्विय सहाय्यकाने सोळंकी यांचेशी संपर्वâ करून आश्रमशाळा व डि. एड. कॉलेजची मान्यता मिळवुन देण्याचे आश्वासन दिले. आश्रमशाळेसाठी १२ लाख व डि.एड. कॉलेजसाठी ३० लाख असे एकुण ४२ लाख रूपयांची मागणी करण्यात आल्याची सोळंकी यांची तक्रार आहे. मात्र त्या नंतरच्या कालावधीत झालेल्या निवडणुकीमध्ये ना. मोघे पराभुत झाले.
त्यानंतर मान्यता मिळवुन देण्याच्या कामासाठी सातत्याने टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामुळे सोळंकी यानी काम होत नसेल तर पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र अजुनपर्यंतही ४२ लाख रूपये परत करण्यात आले नसल्याचे सोळंकी यांचे म्हणने आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पैसे घेतल्याबाबत

ना. मोघेंच्या शासकीय ‘लेटरपड' वर पत्रही देण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकषी करण्यात यावी अशी मागणी सोळंकी यांनी केली आहे. मात्र या दरम्यान मंत्र्यानी आपले वजन वापरून पोलीस कार्यवाही होऊ दिली नाही. त्यामुळे सोलंकी यानी यवतमाळ न्यायालयात यविरोधात दाद मागीतली. त्यानुसार न्यायालयाने वडगाव रोड पोलीसांना कलम १५६ (३) फौजदारी प्रक्रीया संहितेप्रमाणे आरोपींवर खटला दाखल करून ६० दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.

नामांकन मागे घेण्याच्या प्रक्रीयेला मुदतवाढ


कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नामांकन मागे घेण्याच्या प्रक्रीयेला १ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
मोघे-लोणकर व पारवेकर गटातील महत्वाच्या उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने त्यांनी यविरोधात अपील केले आहे. निर्णय उमेदवारांच्या बाजुने लागल्यास त्यांना निवडणुकीत संधी मिळु शकते. आज ११ उमेदवारांनी आपले नामांकन मागे घेतले. आता १ ऑगस्ट पर्यंत उमेदवारांना माघार घेता येणार आहे. त्यामुळे १ ऑगस्ट नंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

Wednesday 20 July 2011

पाऊस आला अन सर्वस्व घेऊन गेला......!





उन्हाळ्यात घाम गाळुन मशागत केलेली शेती अंकुरायलाच आली होती मात्र महिण्याभरापासुन ज्या पावसाची वाट होती त्यानेच आपले रौद्र रूप दाखवून सर्वस्व वाहुन नेले. अशी प्रतिक्रीया घाटंजी तालुक्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. गेल्या काही दिवसात झालेल्या ढगपुâटी सारख्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील शेतपिके पार खरडून निघाली. तर घरांमध्ये पाणी घुसल्याने झालेले नुकसान लाखोंच्या घरात आहे. कुर्ली, वाढोणा, पारवा येथे अनेक घरांची पडझड झाली आहे. तर पारवा परिसरातील सगदा, ठाणेगाव येथे शेतपिके वाहुन गेली आहेत.

नंदकिशोर पायताडे यांना आदर्श शेतकरी पुरस्कार



तालुक्यातील शिरोली येथिल उपक्रमशील शेतकरी नंदकिशोर आनंदराव पायताडे यांना नुकतेच आदर्श शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात आले. स्व. वसंतराव नाईक जयंतीनिमित्य यवतमाळ जिल्हा परिषदेच्या वतीने एका समारंभात जि.प.उपाध्यक्ष रमेश मानकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गौरवचिन्ह व ३ हजार रूपये रोख देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

झटाळा आरोग्य उपकेंद्राला आनंदीबाई जोशी पुरस्कार


तालुक्यातील झटाळा आरोग्य उपकेंद्राला या वर्षीचा आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळाला असुन हे उपकेंद्र जिल्ह्यातील ३६६ उपकेंद्रातून सर्वोत्कृष्ठ ठरले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख १५ हजार रूपये देऊन आरोग्य सेविका शांताबाई चव्हाण यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल ठाकरे, जिल्हाधिकारी श्रावण हर्डीकर, जि.प. उपाध्यक्ष रमेश मानकर, आरोग्य सभापती अरूण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गणेश रचवुंâटवार यांचेसह मान्यवरांची उपस्थिती होती.

Tuesday 19 July 2011

काष्ठशिल्पकलेतील घाटंजीचा "हुसेन"







कलाकार हा परिसासमान असतो. जसे लोखंडाला परिसाचा स्पर्श होताच त्याचे सोने होते तसेच एखाद्या वस्तुला कलाकाराच्या हाताचा स्पर्श होताच इतरांच्या दृष्टीने निरूपयोगी असलेली वस्तूही मनमोहक होऊन जाते. लाकडाचे फर्निचर बनवितांना निघणा-या चरपटांचे आपल्या दृष्टीने काय मोल? मात्र घाटंजीतील राजेंद्र देशमुख यांनी त्यातील सौंदर्य ओळखून एका वेगळ्याच कलेला जन्म दिला.
सहज मनात आलेल्या कल्पनेतुन आज त्यांनी स्वत:चे विश्व निर्माण केले आहे. प्रसिद्ध चित्रकार दिवंगत मकबुल फिदा हुसैन यांच्या सारखाच ‘लुक' असलेले राजेंद्र देशमुख हे काष्ठशिल्पकलेतले ‘हुसैन'च आहेत. ते पुर्वी पांढरकवडा एस.टी. आगारात वाहकपदी कार्यरत होते. ते नोकरीवर असतांना त्यांच्या शेजारी लाकडी फर्निचर बनविणारा व्यक्ती राहत होता. देशमुख यांना चित्र काढण्याचा छंद होता. त्यामुळे शेजारपाजारची मुले त्यांच्याकडे चित्रे काढुन घेण्यासाठी यायची. एकदा एका मुलाला चित्र काढुन देताना त्यांचे लक्ष लाकडी चरपटाकडे गेले. त्यावरील छटा पाहुन त्यांच्या मनात विचार घोळु लागले. त्यांनी काढलेल्या पक्षाच्या चित्रावर रंगाऐवजी चरपटावरील रंगसंगतीचा वापर करून ती चित्रावर चिकटवली. अन तिथुन सुरू झाला एका जगावेगळ्या कलेचा अद्भुत प्रवास. चित्रानंतर त्यांनी त्यापासुन वस्तू बनविल्या. सुरूवातीस गंमत म्हणुन सुरू केलेल्या या कलेचे त्यांना अक्षरश: वेड लागले. मनात आलेल्या कल्पनांना लाकडी चरपटांच्या माध्यमातुन आकार देतांना ते त्यामध्ये हरवुन जात असत. मात्र नोकरीमुळे कलेला अपेक्षीत वेळ देऊ शकत नसल्याने त्यांना नोकरीची अडचण वाटायला लागली. अखेर २००१ मध्ये एस. टी. च्या वाहकपदाचा राजीनामा देऊन थेट घाटंजीची तिकीट काढली. अन ते कलाविश्वात रममाण झाले. लाकडी चरपटे व  फेविकॉल वापरून त्यापासुन एकापेक्षा एक सुरेख अन अकल्पनीय वस्तु साकारल्या. भिंतीवर लक्ष वेधुन घेणारे वॉलपीस, जुन्या जमान्यातील ग्रामोफोन, पुâलदाण्या, अशा एक ना अनेक नित्योपयोगी व शोभेच्या वस्तू त्यांनी बनविल्या आहेत. आज त्यांच्या संग्रही हजारो वस्तुंचे भांडार झाले आहे. या वस्तूंचे संग्रहालय उभारण्याचा त्यांचा मानस आहे.
त्यांची पत्नी सौ. सुनंदा व पुत्र राहुल यांचा सुद्धा या कलेला हातभार असतो. त्यांच्या पत्नीने लाकडी चरपटापासुन बनविलेल्या रिंग पासुन १४५  फुट लांब साखळी बनविली आहे. या साखळीत सुमारे २५ हजार रिंग चा वापर करण्यात आला आहे. अशा प्रकारची जगातील सर्वात लांब साखळी बनविणार असल्याचे ते म्हणाले. अरूंद तोंडाच्या बाटलीमध्ये विवीध कलाकृती साकारण्याचे तंत्रही त्यांनी अवगत केले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या २४५ बाटलीतील कलाकृती त्यांनी तयार केल्या आहेत. आजवर त्यांनी दिल्ली, मुंबई, पुणे, हैद्राबाद, बंगलोर यासह विवीध ठिकाणी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतला आहे. कलाकार हा समाजाचे प्रतिबिंब कलेतून साकारतो. समाजातील सत्य पुढे आणतो. त्यामुळेच अनेकदा त्यांचेवर टिका होते. सत्यता असलेल्या कलाकृती वादग्रस्त ठरतात. समाजाने कलाकाराची भावना समजुन घ्यावी अशी अपेक्षा राजेंद्र देशमुख व्यक्त करतात.

शब्दांकन 
अमोल राउत, घाटंजी 



संपर्क 
राजेंद्र देशमुख
Mobile No. 9850761464

Monday 18 July 2011

बाजार समिती निवडणुकीत दिग्गजांची नामांकने रद्द

बाजार समिती निवडणुकीत दिग्गजांची नामांकने रद्द

कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजीच्या निवडणूक नामांकन अर्ज छाननीत सत्ताधारी पारवेकर गट व प्रस्थापीत मोघे लोणकर गटाच्या सुमारे आठ उमेदवारांचे नामांकन रद्द करण्यात आले. विवीध कारणांवर तिसNया आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या आक्षेपात तथ्य आढळल्याने निवडणुक निर्णय अधिकाNयांनी सुमारे आठ दिग्गजांसह १७ उमेदवारांचे नामांकन रद्द केले. राष्ट्रवादी कांँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश डंभारे, विद्यमान संचालक सुरेश भोयर, प्रकाश खरतडे, संजय डंभारे, सुरेश लोणकर यांचे सुपूत्र आशीष लोणकर, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक एकलाख खान पटेल, रामु पवार, माया पवार या चर्चेतल्या उमेदवारांचा समावेश आहे. एकमेकांविरोधात आक्षेप घ्यायचे नाही असा तोंडी करार पारवेकर गट व
मोघे-लोणकर गटादरम्यान झाला होता. याची कुणकुण तिसNया आघाडीतील नेत्यांना लागल्याने त्यांनी तांत्रीक मुद्यांवर आक्षेप घेतले. नियमानुसार ते आक्षेप योग्य असल्याने नामांकने रद्द करण्यात आली. आता १८ जागांसाठी ८० उमेदवार रिंगणात आहेत. महत्वाचे उमेदवार बाद झाल्याने दोन्ही मुख्य गटांना चांगलाच फटका बसला आहे. छाननीअंती व्यापारी गटात ९, हमाल मापारी गटात ४, ग्रामपंचायत गटात ४, ग्रामपंचायत सर्वसाधारण गटात १३, सहकारी मतदार संघ ६, सहकारी संस्था (ई.मा.व.) ५, सहकारी संस्था (अ.जा.) ६ व सर्वसाधारण गटातुन २८ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत.

Sunday 17 July 2011

अरेच्चा..! उन्मळुन पडलेले झाड अचानक उभे झाले


बसस्थानकाकडे जाणाया रस्त्यावर बघ्यांची गर्दी...येणारा प्रत्येकजण येथे थांबुन विचार करीत परतायचा की, हे झालंच कसं ? वादळात मुळासकट उन्मळुन पडलेलं भलं मोठं झाड अचानक दोन महिण्यानंतर उभं कसं झालं ? हा निसर्गाचा चमत्कार की आणखी काही ? एक ना अनेक प्रश्नांनी चर्चेला पेव फुटले होते.
दि. १९ मे रोजी घाटंजी परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे अनेक मोठमोठे वृक्ष उन्मळुन पडले होते. त्यात बसस्थानकाकडे जाणा-या रस्त्यावरील हे भलेमोठे झाड सुद्धा जमिनीवर कोसळले होते. हे झाड रस्त्यावरून हटवायला सार्वजनिक बांधकाम विभागाला चार ते पाच दिवसाचा कालावधी लागला होता. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुक ठप्प झाली होती. एस.टी. महामंडळाच्या बसेस सुद्धा अन्य मार्गाने वळविण्यात आल्या होत्या. रहदारीचा रस्ता असुनही येथे विद्युत दिव्यांची व्यवस्था नाही. रात्रीच्या वेळी हा रस्ता अंधाराच्या हवाली होतो. हे झाड हटविण्यासाठी सा.बां.विभागाकडुन अक्षम्य हलगर्जीपणा झाला. या दरम्यान मनोज तोडकर हा इसम रात्री दहाच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना रस्त्यावर पडलेल्या झाडावर जाऊन आदळला. सुमारे एक ते दिड महिना मृत्युशी झुंज दिल्यानंतर अखेर त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या मृत्युस या विभागाचा निष्काळजीपणाच कारणीभुत आहे हे निश्चित. या दोन महिण्यांच्या कालावधीत झाडाचे खोड रस्त्याच्या कडेला पडून होते. आता अचानक एका रात्रीतुन हे झाड उभे झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. कोणी म्हणतो की, पावसामुळे माती खचल्याने झाड उभे झाले. मात्र एवढे अवाढव्य झाड सरळ अवस्थेत उभे राहीलच कसे?  
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी मेहेत्रे यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता सुरूवातीला ते म्हणाले की, झाडाचा लिलाव करावयाचा असल्याने ते क्रेनच्या साहाय्याने उभे केले आहे. लवकरच ते तिथुन हटविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. मात्र अवघ्या काही वेळातच त्यांनी पुन्हा संपर्क  करून सांगीतले की, या झाडाची लिलावप्रक्रिया झाली आहे. मात्र कंत्राटदाराने काम सुरू केले नाही. ते झाड कुणीही उभे केले नसुन आपोआपच ते सरळ झाले आहे असे ते म्हणाले. त्यामुळे ‘झाड’ प्रकरणाचे गुढ अधिकच वाढले आहे. रात्रीच्या वेळी क्रेनच्या साहाय्याने झाड उचलण्यात आल्याचे काही लोक सांगत आहेत. या झाडाची गोलाई अंदाजे ३०० सेंटीमीटर आहे, लांबी १५ फुट तर वजन सुमारे ४ टन आहे. एवढे अवाढव्य झाड आपोआप उभे राहु शकत नाही असा कयास वर्तविल्या जात आहे. आज दिवसभर अचानक उभ्या राहिलेल्या या झाडाची चांगलीच चर्चा घाटंजी शहरात सुरू होती.
साभार :- देशोन्नती