Pages

Saturday 19 November 2011

मंगळसुत्र चोर महिलांच्या टोळीचा घाटंजीत धुमाकूळ


बसस्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासुन मंगळसुत्र चोर महिलांच्या टोळीने धुमाकूळ घातला असुन पोलीस विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. आज दुपारच्या सुमारासही पाच ते सहाच्या संख्येत असलेल्या महिलांनी दोन महिलांचे मंगळसुत्र तसेच सुमारे सहा हजार रूपये रोख रूपये लंपास केले. ही बाब लक्षात आल्याने सदर महिला व परिसरातील नागरिकांनी त्या महिलांचा पाठलाग केला. जेसिस कॉलनी मध्ये फिरत असतांना त्या महिलांना गाठले. जमावाला लक्षात येऊ नये म्हणुन  गिलानी महाविद्यालयाच्या मैदानात सदर चोरट्या महिलांनी साड्याही बदलल्या. मात्र त्या दरम्यान सुमारे १०० ते २०० लोकांचा जमाव एकत्र आल्याने सदर महिला त्यांच्या तावडीत सापडल्या. यावेळी त्यांच्या जवळील पिशव्यांची झडती घेतली असता त्यामध्ये दोन मंगळसुत्र व रोख रक्कम सापडली. मात्र पोलीस योग्य वेळी न पोहचल्याने सदर महिला पसार झाल्या. घटना घडताच बसस्थानकावरून काहींनी पोलीस स्टेशनला सुचना दिली होती. मात्र बराच वेळ पोलीस न आल्याने नागरीकांनीच त्या महिलांचा पाठलाग केला. सुमारे एक दिड तासाने पोलीस आल्यावर त्यानी महिला ज्या दिशेने गेल्या तिथे शोध घेतला व पाच महिलाना ताब्यात घेतले. ज्यांचे मंगळसुत्र व रोख रक्कम चोरीस गेली होती त्यांना ती मिळाल्यामुळे त्यानी घटनेची फिर्याद नोंदवली नाही. त्यामुळे पोलीसांनीही अवघ्या काही मिनीटात त्यांना थातुरमातुर चौकशी करून सोडुन दिले. फिर्याद देण्यास कोणी पुढाकार न घेतल्यामुळे हाती आलेली टोळी निसटुन गेली. घाटंजी बसस्थानकावर चोरट्या महिलांची ही टोळी नेहमीच सक्रीय असते. मात्र पोलीसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने चोरट्यांच्या टोळीला प्रोत्साहनच मिळत आहे.

No comments:

Post a Comment