Pages

Wednesday 7 September 2011

घाटंजीच्या पोलीसांना लागला गुन्हेगारी प्रवृत्तींशी ‘लळा’


सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रिद वाक्य असले तरी घाटंजी पोलीस दलाने मात्र आपल्या वागणुकीने खलरक्षणाय सदनिग्रहणाय असा अर्थच बदलुन टाकला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तींवर पोलीसांचा वचक असणे गरजेचे आहे. खरं तर ते पोलीसांचे प्राथमीक कर्तव्य आहे. मात्र गेल्या काही महिण्यांपासुन घाटंजी व पारवा पोलीस स्टेशन हद्दीत अनुभवास आलेल्या प्रकरणांनी पोलीसांनी सर्वसामान्य नागरीकांपेक्षा गुन्हेगारांनाच झुकते माप दिल्याचे पुढे आले आहे. घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाबुराव खंदारे तसेच सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरनूले यांनी तर कित्येक प्रकरणांमध्ये अधिकाराचा गैरवापर करून आरोपींना संरक्षण देण्याचेच काम केले आहे. कोणतीही तक्रार आली तर सर्वप्रथम ती एफ.आय.आर. केली जावी असा नियम आहे. मात्र असे क्वचितच झाल्याचे आढळते. सुमारे ९० टक्के तक्रारकर्त्यांना धमकावुन आल्यापावली परत पाठविल्या जाते असा अनुभव आहे. कायद्याची जाण असणा-यांनी आग्रह केलाच तर या ना त्या माध्यमातुन त्यांचेवर दबाव आणल्या जातो. किंवा त्यांचे विरोधात तक्रार करण्यास प्रवृत्त केल्या जाते. हा सर्व खटाटोप केल्यावर पोलीस अधिका-यांचा खिसा चांगलाच गरम झालेला असतो.
अशा अनेक प्रकरणात घाटंजी पोलीसांनी एकतर्फी कारवाई केल्याचे निदर्शनास आले आहे. वासरी येथिल भारत निर्माण योजनेतील आरोपी तब्बल दोन महिने फरार होते. त्यानंतर या घोटाळ्याची तक्रार करणा-यांवर तडकाफडकी गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या महिन्याभरात सहाय्यक पोलीस निरिक्षक गुरनूले यांनी काही जुगार अड्ड्यांवर मारलेले छापे संशयास्पदच होते. या छाप्यांदरम्यान केवळ काही जुगा-यांवरच गुन्हे दाखल करण्यात आले. अनेक प्रतिष्ठीत यातुन सराईतपणे निसटले. घाटंजी तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारू, कोंबडबाजार, मटका व जुगार मोठ्या प्रमाणावर चालतो. घाटंजी शहरात तर त्याचे दुकानच थाटले आहे. पारवा परिसरातुन मोठ्या प्रमाणावर गांज्याची तस्करी होते. या अवैध व्यावसायीकांचा घाटंजी पोलीस स्टेशनच्या अधिका-यांना एवढा लळा लागला आहे की, पोलीस अधिक्षकांचा आदेश असुनही तालुक्यात अशा व्यवसायांवर नियंत्रण आलेले नाही. उलट या आदेशामुळे हप्त्यामध्ये वाढ होऊन पोलीसांचे त्यांना सक्रिय सहकार्य लाभत आहे. केवळ थातुर मातुर कागदोपत्री कार्यवाही दाखवुन वरिष्ठांची बोळवण केल्या जात आहे. दोन दिवसांपुर्वी झालेल्या घटनेने तर पोलीसच असुरक्षीत असल्याचे निदर्शनास आले आहे. एवढेच नव्हे तर कायद्यातील खाचखळग्यांची प्रत्यक्ष माहिती असलेल्या पोलीसालाही न्यायासाठी झगडावे लागते अन तेही एका अवैध व्यावसायीकाविरोधात, हा खरच पोलीस दलाला आत्मचिंतन करायला लावणारा विषय आहे.
आपल्याच एका कनिष्ठ कर्मचा-याला पोलीस स्टेशनच्या आवारात मारहाण होते. मात्र अधिकारी त्या आरोपीवर कार्यवाही करण्या ऐवजी कायद्याची भाषा वापरून पाठीशी घालतात. यामुळे पोलीस कर्मचा-याचे मनोधैर्य तर खचेलच शिवाय गुन्हेगारांचा मस्तवालपणा नक्कीच वाढेल. पोलीसाला मारहाण करून मोकाट फिरणा-याविरोधात कुणी काही कसे बोलणार? गुन्हेगारांना संरक्षण देण्याच्या घाटंजी पोलीसांच्या ‘बाबुराव पटर्न' मुळे येणा-या काळात या भागात कायदा व सुव्यवस्थेचा गंभिर प्रश्न निर्माण होणार अशी स्पष्ट चिन्हे दिसुन येत आहेत. 
अमोल राऊत

साभार :- दै. देशोन्नती



No comments:

Post a Comment