Pages

Saturday 31 December 2011

केशटोभाऊंच्या शुभेच्छांनी होर्डींगबाजांना चपराक

मिश्कील शुभेच्छा फलकांची घाटंजीत चर्चा 


अरेच्चा आता हा कोण नविन नेता तयार झाला ? हा तर गावभर सर्वांना शिव्या देत फिरणारा केशटो. याच्याही नावाचे होर्डींग ? ही तर कमालच झाली. आजकाल मोठ्या फलकावर फोटो व नाव आले की तो नेता होऊन जातो. ज्याच्या मागे चार कार्यकर्ते नाहीत त्या नेत्याच्या वाढदिवशी मोठमोठे शुभेच्छा फलक लागतात. मग बिचारे केशटोभाऊ का प्रसिद्ध होऊ नये? त्यांच्याही नावाचे होर्डींग्स का लागू नये? अशा मिश्कील खुसखुशीत चर्चांनी आज घाटंजीकरांची सकाळ सुरू झाली. याला कारण ठरले मानसिक संतुलन बिघडल्याने शहरात शिव्या देत फिरणा-या केशटो नामक ईसमाच्या नावाने सगळीकडे लावण्यात आलेल्या नविन वर्षाच्या शुभेच्छा फलकांचे. घाटंजीतील पोलीस स्टेशन चौक, सिनेमा टॉकीज चौक, शिवाजी चौक तसेच ईतर भागातही हे फलक लावण्यात आल्याने रस्त्यावरून ये-जा करणारा प्रत्येकजण त्याकडे कुतूहलाने पाहत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. एक वेडसर महिला तर पोलीस स्टेशन चौकात हे फलक न्याहाळत बराच वेळ उभी होती. आपल्या सोबत फिरणारा केशटो आज ईथे कसा याचे तिला मोठे नवल वाटले. गेल्या दोन तिन वर्षांपासून घाटंजी शहरात कोणत्याही निमित्याने होर्डींग्स लावण्याचे फॅडच झाले आहे. एका माजी नगरसेवकाचा तर अशा होर्डींग्सबाजीत हातखंडा आहे. त्याचा स्वत:चा वाढदिवस असो वा त्याच्या सर्वोच्च नेत्याचा, शहरात सर्वत्र फलक लावण्यात येतात. काही वर्षापुर्वी तर त्याने रस्त्याच्या मधोमध पथदिव्याच्या खांबावर लावलेल्या होर्डींग्सवर रोषणाई करण्यासाठी बेकायदेशीरपणे चक्क पथदिव्यांच्या कनेक्शन मधुनच विज पुरवठा घेतला होता. सद्यस्थितीत काही राजकीय पक्षांकडे कार्यकर्त्यांची कमतरता असल्यामुळे हवसे गवसेही फलकावर झळकतात. अशांना केशटोभाऊंच्या शुभेच्छांमुळे आता थोडा विचार करावा लागणार आहे. अशी विबंडनात्मक फलके लावण्याचा पहिला प्रयोग औरंगाबाद शहरात झाला. त्यानंतर यवतमाळकरांनी उपरोधीकपणे टॉमीच्या वाढदिवसाला असे शुभेच्छा फलक लावले होते. त्यावेळी माध्यमांनी याची प्रकर्षाने दखल घेतली होती. आता घाटंजीकरांनी आपल्या विनोदबुद्धीतून एक वेगळा संदेश जगापुढे ठेवला आहे. मोठमोठ्या होर्डींग्समुळे शहराच्या होणा-या विद्रुपीकरणाला यामुळे आळा बसेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. काहीही असले तरी नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या घाटंजीकरांना चर्चेसाठी एक खमंग विषय मिळाला हे निश्चित.

घरकुलाच्या आशेने आलेल्या हजारो गरीबांची निराशा

ना.मोघेंच्या जनता दरबाराचा बोजवारा
कथितपणे प्रशासनाच्या चुकीमुळे घरकुलापासून वंचीत राहिलेल्या लाभाथ्र्यांसाठी सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. आता आपल्याला घरकुल मिळणार या भाबड्या आशेने सुमारे दोन हजार ग्रामस्थ आपली रोजमजुरी बुडवून येथिल सांस्कृतीक भवनात जमले होते. ना.मोघे आपल्या समस्या ऐकुन घेणार व तडकाफडकी कार्यक्रमातच जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिका-यांना सुचना देणार अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र कार्यक्रम पत्रिकेतील एकही प्रमुख मान्यवर उपस्थित न राहिल्याने जनता दरबाराचा पार बोजवारा उडाला. यावेळी आलेल्या ग्रामस्थांकडून घरकुलासाठी साधे घेण्यात आले.
मात्र कोणाचीही समस्या ऐकुन घेण्यात आली नाही. अनेकांना गर्दीमुळे अर्ज देता आले नाही अशांनी ग्रामसभेत अर्ज द्यावेत अशी सुचना देण्यात आली. यापलीकडे या जनता दरबारात ठोस असे काही झाले नाही. पंचायत समिती सदस्य सहदेव राठोड यांनी कालच पत्रपरिषद घेऊन या जनता दरबाराचा निषेध नोंदविला होता हे विशेष. खेड्यापाड्यातुन अनेक नागरिक आपली कामे सोडून आले होते. मात्र जनता दरबाराने निराशा केल्याने ग्रामस्थांनी याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली. केवळ निवडणुकीच्या तोंडावर आपल्या प्रसिद्धीसाठी प्रशासकीय यंत्रणेला वेठीस धरून आयोजीत केलेल्या जनता दरबाराचा म.न.से.चे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे व पंचायत समिती सदस्य डॉ. विजय कडू यांनी निषेध नोंदविला आहे.


झटाळा येथे शेतीच्या वादातून भावाचा खुन
शेतीच्या वादातून तालुक्यातील झटाळा येथे लहान भावाने मोठ्या भावाचा बैलगाडीच्या उभारीने मारहाण करून निर्घुण खुन केल्याची घटना काल (दि.३०) ला रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. आरोपी अशोक पुनाजी आत्राम (२८) याने त्याचा मोठा भाऊ मारोती पुनाजी आत्राम (३५) याचेशी शेतीच्या विषयावरून वाद घालुन भांडण केले. वाद विकोपाला गेल्याने त्याने बैलगाडीच्या उभारीने भावास बेदम मारहाण केली. यात मारोती याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पारवा पोलीसांनी आरोपीविरूद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असुन आरोपी अद्याप फरार आहे.

साभार:- देशोन्नती

प्रा.प्रदीप राऊत आचार्य पदवीने सन्मानीत

संशोधनातील निष्कर्ष देणार युनो व मानवाधिकार आयोगाकडे
शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.प्रदीप रामकृष्ण राऊत यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने नुकतेच आचार्य पदवीने सन्मानीत केले आहे. मराठी विषयाकरिता प्रदान करण्यात आलेल्या त्यांच्या पदवी प्रबंधनाचा विषय ‘साठोत्तर मराठी कादंबरीतील ठळक व्यक्तीरेखांच्या मनोवृत्ती व भुमिकांचा चिकित्सक अभ्यास' हा आहे. १ हजार ७७३ पानांचा हा द्विखंडातील संशोधन प्रबंध महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रबंध ठरला आहे हे विषेश. यासाठी त्यांना कला वाणिज्य महाविद्यालय यवतमाळचे प्राचार्य डॉ.रा.गो.चवरे यांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्रातील सामाजीक वास्तवाचे भीषण रूप दर्शविणा-या सामाजीक, दलित, ग्रामीण, प्रादेशीक, राजकीय व मार्क्सवादी अशा ७५ कादंब-या व १५० संदर्भ ग्रंथांच्या चिकित्सक अभ्यासाने सुमारे साडेपाच वर्षानंतर हा प्रबंध पुर्णत्वाकडे गेला. सदर प्रबंधात २५० पेक्षा अधिक निष्कर्ष काढले असुन पुस्तिकेच्या स्वरूपात ते महाराष्ट्र शासन, नियोजन आयोग, स्वयंसेवी संस्था व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे पाठविण्याचा आपला मानस प्रा.राऊत यांनी व्यक्त केला. प्रा.राऊत यांचे याच विषयानुषंगाने आजवर ४ रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले असुन गॅट व डंकेल कराराची अंमलबजावणी व त्याच्या भयावह परिणामानंतर मराठी कादंबरीच्या माध्यमातुन मांडण्यात आलेले त्याचे भिषण परिणाम, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी नुकताच त्यांनी 'जागतिकीकरणाने प्रभावित मराठी कादंबरीतील पात्रमुखी विचारधारा' या विषयावरील मेजर रिसर्च प्रोजेक्ट विद्यापीठ अनुदान आयोगाकडे ६ लाख रूपयांच्या संशोधन अनुदानाकरीता पाठविला आहे. या संशोधनामुळे राज्याच्या हितासाठी विद्यापीठामार्फत संयुक्त राष्ट्रसंघ व जागतीक बँकेकडे अनेक शिफारसी करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रा.राऊत यांचे ‘गर्भार लोकशाही’ व ‘स्वातंत्र्याच्या शोधात’  हे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. 
त्यांच्या या संशोधनातील यशासाठी संस्थेचे अध्यक्ष सदरूद्दीन गिलानी, उपाध्यक्ष संजय गढीया, सचिव अनिरूद्ध लोणकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.ए.शहजाद, माजी प्राचार्य के.एम.वाघ यांचेसह महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व कर्मचा-यांनी कौतुक केले आहे.

Wednesday 28 December 2011

घाटंजीच्या नगराध्यक्षपदी कॉंग्रेसचे जगदीश पंजाबी

उपाध्यक्षपदी रा.कॉ.चे अकबर तंव्वर
नगराध्यक्षपदाच्या आज झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे जगदिश पंजाबी यांचा एकतर्फी विजय झाला. तर न.प.उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अकबर तंव्वर विजयी झाले. नामनिर्देशीत सदस्यांमध्ये माजी नगराध्यक्ष सुभाष गोडे तसेच संजय राऊत यांची वर्णी लागली. नगराध्यक्षपदासाठी कॉंग्रेसचे जगदिश पंजाबी व सेनेच्या शर्मिला उदार यांनी नामांकन दाखल केले होते. यामध्ये १३ नगरसेवकांनी पंजाबी यांच्या बाजुने तर केवळ ४ नगरसेवकांनी शर्मिला उदार यांच्या बाजुने मतदान केले. उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अकबर तंव्वर व सेनेच्या सरोज पडलवार यांनी नामांकन दाखल केले होते. तंव्वर यांना १३ व पडलवार यांना ४ मते पडली. गटनेत्यांच्या निवडीवर शिवसेनेने मोठ्या दिमाखाने आक्षेप घेतला होता. मात्र पीठासीन अधिका-यांनी तो फेटाळला. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाल्याने नगराध्यक्षपदी पंजाबी यांची निवड जवळजवळ निश्चित झाली होती. सकाळी १० वाजता निवडणुक प्रक्रीयेला सुरूवात झाली. दुपारी २ वाजताच्या सुमारास निकाल घोषीत झाला. यावेळी नगर परिषदेच्या परिसरात नागरीकांची प्रचंड गर्दी जमली होती. निकालानंतर शहरातुन विजयी मिरवणुक काढण्यात आली.  पीठासीन अधिकारी म्हणुन उपजिल्हाधिकारी एस.पी.झंझाड होते. मुख्याधिकारी गिरिश बन्नोरे तसेच नगर परिषद कर्मचा-यांनी निवडणुक प्रक्रीया पार पाडली. पोलीस उपनिरिक्षक अरूण कोंडे यांच्या नेतृत्वात पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

गिलानी महाविद्यालयाच्या रा.से.यो. शिबिराने दिला स्वच्छतेचा मुलमंत्र











स्थानिक शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयाचे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबीर नुकतेच दत्तकग्राम मुरली येथे संपन्न झाले.
या शिबीरात रा.से.यो.स्वयंसेवकांनी विवीध सामाजीक समस्या, स्वच्छता, आरोग्य यासह अनेक बाबतीत ग्रामस्थांना मार्गदर्शन करून त्यांचे प्रबोधन केले. शिबीराचे उद्घाटन शि.प्र.मं.चे उपाध्यक्ष संजय गढीया यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.ए.शहेजाद होते. यावेळी संस्थेचे सचिव अनिरूद्ध लोणकर, जिल्हा समन्वयक डॉ.अजय लाड, आर.यु.गिरी, मुरली ग्रा.पं.सरपंच दिपमाला निकम, मुख्याध्यापीका सी.बी.ढोणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबीरादरम्यान ग्रामस्वच्छता, आरोग्य तपासणी व औषध वाटप, महिला सक्षमीकरण उपक्रम, गाजरगवत व बेशरम निर्मुलन, एड्स जनजागृती अभियान, हागणदारीमुक्त ग्राम अभियान राबवीण्यात आले. तसेच याबाबतचे महत्व गावक-यांना पटवुन देण्यात आले. याशिवाय दररोज घेण्यात आलेल्या बौद्धीक सत्रात स्त्री भृणहत्या, आरोग्य व योगसाधना, बदलत्या समाजव्यवस्थेत युवकांची भुमिका, वेध भविष्याचा, रक्तदानाची गरज, आपत्ती व्यवस्थापन व युवकांची भुमिका, जागतीकीकरण व भारत, आजचा युवक-अंधश्रद्धा व व्यसनमुक्ती, शेतीची दिशा व दशा अशा विवीधांगी विषयांवर डॉ.एम.आर.शुक्ला, डॉ.दिपक राठोड, प्रा.गोविंद तिरमनवार, प्रा.सि.पी.वानखडे, प्रा.डॉ.सागर दखणे पुणे, प्रा.नरेश महाजन, प्रा.योगेश उगले, प्रा.प्रदिप राऊत, प्रा.आर.व्ही राठोड, प्रा.यु.ए.ठाकरे या मान्यवरांनी शिबीराथ्र्यांचे मार्गदर्शन केले. लॉयन्स क्लबच्या तालुका अध्यक्षा साधना ठाकरे यांनी मी स्त्री भृण बोलतेय या विषयावर एकांकीका सादर केली. आरोग्य तपासणी शिबीरात डॉ.भरत राठोड व डॉ.वैश्य यांनी रूग्णांची तपासणी केली. या सात दिवशीय शिबीरादरम्यान जिल्हा समन्वयक डॉ.अजय लाड, सल्लागार समिती सदस्य डॉ.पवन मांडवकर, क्षेत्रीय समन्वयक डॉ.नरेश महाजन यांनी सदिच्छा भेटी देऊन रा.से.यो.स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
या विषेश शिबीराच्या यशस्वीतेसाठी प्रा.व्ही.एस.जगताप, प्रा.ए.पी.भगत, डॉ.सी.आर.कासार, डॉ.निनाद धारकर, प्रा.टी.एम.कोटक, प्रा.एम.एच.ढाले, प्रा.एस.पी.डोमळे, प्रा.कु.जे.पी.मोरे, प्रा.कु.के.आर.किर्दक, प्रा.ए.के.पत्की, प्रा.आर.जी डंभारे, प्रा.हितेश शुक्ला, प्रा.युवराज माहुरे, प्रा.यु.पी.वैश्य, प्रा.एम.एच जैन, प्रा.राहुल वानखडे, सुभाष कनाके, मंदार भुसारी, प्रा.पी.एच निकम, राजु निकम, सुभाष निकम, सुरेश चौधरी, प्रा.टोंगे, श्री.गोल्हर, श्री.डंभारे, यांचेसह मुरली येथिल ग्रामस्थ व गिलानी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे योगदान मिळाले.

रा.से.यो.स्वयंसेवकांद्वारा ग्रामस्वच्छता व गाजरगवत निर्मुलन











गिलानी महाविद्यालयाच्या सात दिवशीय शिबिरादरम्यान स्वयंसेवकांनी ग्रामस्वच्छता केली. तसेच गावात असलेले गाजरगवत, बेशरम निर्मुलन करण्याच्या कामाला हातभार लावला. एड्स विषयक जनजागृती व्हावी यासाठी मशाल रॅली काढण्यात आली.

गिलानी महाविद्यालयाच्या रा.से.यो.पथकाने बांधला वनराई बंधारा










Tuesday 27 December 2011

नशिबाची काजळी पुसून तो धावतोय आयुष्याच्या शर्यतीत

आजच्या काळात जगणे देखील शर्यती प्रमाणेच झाले आहे. कुणी यशाच्या मैलाचे दगड पार करीत उंचीवर जाऊन पोहचतात तर कुणाला वाटेतील खाचखळग्यांमुळे मागे रहावे लागते. विजयी झालेल्यांचे गुणगाण केल्या जाते. मात्र काळाच्या ओघात काही कारणांनी मागे पडलेल्यांची दखल मात्र कुणी घेत नाही हीच आपल्या समाजाची शोकांतीका आहे. अनेकांच्या आयुष्याला वेग देता देता नशिबाने केलेल्या चेष्टेमुळे ईतरांपेक्षा मागे पडलेला राजन भुरे आजही आपल्या अस्तित्वासाठी झगडतोय. घाटंजी पासुन अवघ्या काही अंतरावर असलेल्या शिरोली येथिल राजन ओळखला जायचा त्याच्या वेगासाठी. धावणे हा त्याच्या जगण्याचा आधार. शालेय जिवनापासुनच हा छंद त्याच्या अंगवळणी पडला. अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये लक्षणीय कामगीरी करून कित्येक धावपटुंना राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चमकविणारा हा यशस्वी धावपटु व प्रशिक्षक आज दुर्लक्षीत आहे.  दहावीत असताना नेर येथे झालेल्या २१ कि.मी. मराथॉन स्पर्धेत पहिल्यांदा त्याने सहभाग घेतला. त्यानंतर राजनने कधीच मागे वळुन पाहिले नाही. तब्बल १२ राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगीरी केली. तर एका स्पर्धेत सुवर्ण व दोन स्पर्धांमध्ये रजत पदक मिळविले. कित्येकदा आर्थिक अडचणीमुळे राष्ट्रीय स्पर्धांपासुन त्याला मुकावे लागले. राजन याचे जन्मगाव शिरोली. घरची परिस्थिती बेताचीच. प्राथमिक शिक्षण येथे घेऊन पुढील शिक्षणासाठी त्याने नेर तालुक्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय वटफळी येथे प्रवेश घेतला. 
पाथ्रड (गोळे) येथुन दररोज शाळेत येण्यासाठी तो सकाळी धावतच सुटायचा. हाच सराव अंगात भिनल्याने शालेय स्पर्धांमध्ये कोणीही त्याच्या पुढे जात नव्हता. शिक्षणात त्याचे मन फार रमले नाही. बारावी पर्यंत शिक्षण झाल्यावर तो शिरोलीत परतला. येथे धावण्याचा सराव हाच त्याचा दिनक्रम. घाटंजीला यायचे असेल व एस.टी.बस हुकली तर राजन त्याच बसचा पाठलाग करून घाटंजी पर्यंत यायचा. बस सोबतच्या शर्यतीमुळे घाटंजी तालुक्यात सर्वत्र तो ओळखला जाऊ लागला. या दरम्यान शिरोलीसह तालुक्यातील अनेक खेळाडू राजनशी जुळले. आपल्या अनुभवातून आत्मसात केलेल्या गोष्टी त्याने ईतर धावपटूंना शिकवुन स्पर्धेसाठी तयार केले. तालुक्यातील शाळा, महाविद्यालयातील खेळाडूंना मोफत कोचिंग दिली. शुभांगी चौधरी, सरीता राऊत, बंडू आत्राम, राजु मेश्राम यांनी राष्ट्रीय तर गिता मिलमिले, ममता चावके, श्वेता चावके, अमर झाडे, प्रदीप तुमराम, विमल कोरवते, सतिश भुरे, जया काकडे,  प्रफुल्ल  भुरे, आसावरी बोबडे, माया भुरे, रीया बोबडे, किरण भुरे, मयुर बोबडे, राखी भुरे, राखी भुरे, सचिन मिलमिले, सचिन घोसे, अजय भुरे, सोनु मेश्राम, स्वप्निल चौधरी, उमेश मडावी, रूपेश शिरपुरे, कुणाल जिवने आकाश लोखंडे या धावपटूंनी राज्यस्तरावर मजल मारली. 
२००६ मध्ये नियतीच्या प्रहाराने त्याच्या आयुष्यातील वेगच हरवुन गेला. प्रत्येक  क्षणाला त्याची सोबत करणारी जीवनसंगिनी फुप्फुसाच्या कर्करोगामुळे त्याला सोडून गेली. वाढदिवसाच्या दिवशी नियतीने केलेल्या या क्रूर चेष्टेमुळे त्याला मोठा मानसिक धक्का बसला. यामुळे वा-याशी स्पर्धा करणारा राजन भरकटला. काही वर्ष निराशेच्या गर्तेत गेल्यावर आता तो सावरतोय..........
(उर्वरीत भाग वाचा उद्या)

अमोल राऊत
9423640885
साभार:- देशोन्नती



राजन भुरे
भ्रमणध्वनी :- 9527705628

Friday 23 December 2011

घाटंजीतील राणा जिनींगला भिषण आग





येथिल अकोलाबाजार मार्गावर असलेल्या राणा जिनींगला आज दुपारी लागलेल्या आगीत सुमारे सात लाखांचा कापुस जळुन भस्मसात झाल्याचा अंदाज आहे. दुपारी दोन वाजताच्या सुमारास कापुस तोलाई करतांना वाहनाच्या सायलेंसर मधुन निघालेल्या ठिणगीमुळे बाजुलाच असलेल्या कापसाच्या गंजीला आग लागली. त्यात सुमारे दोनशे क्विंटल कापुस जळाला. जिनिंगच्या परिसरात अनेक कापसाच्या गाड्या असल्याने आग लागताच वाहनधारकांची धावपळ उडाली. यावेळी येथे उपस्थित शेतकरी, जिनिंग मधील कामगार व काही व्यापा-यांनी वेळेवर धावपळ करून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यामध्ये कैलास कोरवते, निलेश जुनगरे, शेरू देवतळे, विठ्ठल कडु, सलीम शेख, होनबा डंभारे, अविनाश भुरे, संजय वातीले, गोविंद परचाके, अभय कटकमवार यांचेसह जिनिंगच्या कामगारांचा समावेश आहे. नगर परिषदेचा पाण्याचा टँकर व एका खासगी टँकरने आग विझविण्यासाठी वापरण्यात आले. यवतमाळ व वणी येथुन अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. मात्र यवतमाळ येथुन अग्निशमन यंत्रणेचे वाहन येण्यास सुमारे दोन तास तर वणी येथिल वाहनाला तिन तासांचा अवधी लागला. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी आग विझविण्यासाठी पावले उचलल्याने पेटलेल्या कापसाच्या गंजीलाच लागुन असलेल्या मोठ्या गंजी पर्यंत आग पसरली नाही. घटनेची माहिती मिळताच नायब तहसिलदार एस.व्ही.भरडे, सुरेश जयस्वाल तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कपील चन्नावार, सहसचिव डी.डी.हिवरकर हे घटनास्थळी दाखल झाले. जिनिंग लगतच पेट्रोलपंप असल्याने तातडीने ते बंद करण्यात आले. विशेष उल्लेखनिय म्हणजे सदर जिनिंग मध्ये आग विझविण्यासाठी अथवा आगीपासुन बचाव व्हावा यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने यंत्रणेला धावपळ करावी लागली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे, संचालक आशिष लोणकर, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांनी घटनास्थळी भेट दिली.


न.प. अध्यक्षपदासाठी ३ नामांकने

नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आज ३ नामांकने दाखल करण्यात आले. कॉंग्रेसच्या वतीने माजी नगराध्यक्ष जगदीश पंजाबी व किशोर दावडा तर शिवसेनेकडून शर्मिला उदार यांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले. सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आले असल्याने संख्याबळानुसार कॉंग्रेसकडे अध्यक्षपद व उपाध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला येणार आहे.
साभार:- देशोन्नती

Monday 19 December 2011

काकड आरती समाप्तीला 'खापरी' येथे मांगल्याची उधळण

वारकरी संप्रदायातील काकड आरतीची परंपरा 
घाटंजी तालुक्यातील ग्रामीण भागात आजही तितक्याच 
आपुलकी व श्रद्धेने जोपासल्या जाते.
 महिनाभर भल्या पहाटे गावातुन
 काकड आरती काढ़ण्यात येते. 
कोजागीरी पौर्णिमा ते कार्तीक पौर्णीमा पर्यंत
 गुलाबी थंडीत निघणा-या काकड आरतीने
 गावातील वातावरण मंगलमय होऊन जाते.
 काकड आरती समाप्तीच्या दिवशी संपुर्ण गावात
 रस्त्यावर रांगोळ्या व फुलांनी सजावट केली जाते.
 घरोघरी काकड आरतीत सहभागी लोकांचे
 पाय धुवून त्यांची पुजा व स्वागत केले जाते. 
आजच्या आधुनिक काळातही 
मांगल्याची उधळण करणारी ही परंपरा
 घाटंजी तालुक्यात श्रद्धेने जोपासल्या जाते.
 अशाच काकड आरती समाप्तीच्या दिवशीची
 खापरी (ता.घाटंजी) या गावची काही छायाचित्रे 
घाटंजी न्युजच्या वाचकांसाठी.....!










(छाया:- अमोल राऊत, पांडुरंग निवल)